सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने 2020 मध्ये झालेल्या शिवरायांचा पाळणा सोहळ्याची जागतिक पातळीवर दखल घेतली होती. त्याच इतिहासाच्या पुनरावृत्तीसाठी जिजाऊंच्या लेकी सज्ज झाल्या आहेत. 18 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजता होणारा पाळणा सोहळा यशस्वी करण्यासाठी 'आई तू जिजाऊ हो' हा संदेश देत घरोघरी पोहोचण्याचा निर्धार जिजाऊंच्या लेकींनी केला आहे. अठरापगड जातीच्या महिलांनी जिजाऊंच्या वेशात पाळणा सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने तब्बल दोन वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा पाळणा सोहळा होणार आहे. यासाठी महिला नियोजन बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीस महामंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष मतीन बागवान, पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, श्रीकांत डांगे, भाऊ रोडगे, विनोद भोसले, सचिन स्वामी, कल्याण गव्हाणे, देविदास घुले यांच्यासह महिला प्रतिनिधी प्रा. ज्योती वाघमारे, सुषमा घाडगे, उज्ज्वला साळुंखे, उत्तरा बरडे-बचुटे, निर्मला शेळवणे, अर्चना बरडे, स्वाती रूपनर, संजीवनी फुटाणे आदी उपस्थित होत्या.
याप्रसंगी जिजाऊंच्या सर्व लेकींनी 18 फेबुवारी रोजी होणारा शिवरायांचा पाळणा सोहळ्याची रंगीत तालीम केली. याप्रसंगी अमृता केकडे, रेखा गायकवाड, पूनम बनसोडे, अनुराधा बनसोडे, सिया मुलाणी, शशिकला कसाटे, मोहिनी चटके, अश्विनी भोसले, वैभवी पवार, जयश्री पवार, राधा पवार, वासिमा खान, मनिषा नलावडे, सुवर्णा यादव, चारुशीला झांबरे, माधुरी चव्हाण, सुरेखा जगताप, सुनंदा सादुल, जया रणदिवे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दोन वर्षांच्या पाळणा सोहळ्यात मुस्लिम समाजाच्या महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यंदाचे उत्सव अध्यक्षपद जिजाऊ मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान यांच्याकडे असल्यामुळे त्यामुळे यंदा हिंदू-मुस्लिम एकोप्याचा संदेश दिला गेला आहे. त्यामुळे यंदाच्या पाळणा सोहळ्यात पाच हजार मुस्लिम महिला सहभागी होणार असल्याचे बागवान यांनी यावेळी जाहीर केले.
काठपदर साडी, केशरचना, अंबाडा, गजरा, डोक्यावरुन पदर, सर्व पारंपरिक दागिने, नथ, कानातली चंद्रकोर, कुंकू ठुशी, वज्रटीक, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, काळी पोत, पाटल्या, बांगडी, बाजूबंद, लक्ष्मीहार, जोडवी, पैंजण, साखळी तोडे असे दागिने वापरण्यात येणार आहेत. पारंपरिक वेशाबरोबर सोन्याचे नाही तर नकली दागिने परिधान करुन येण्याचे आवाहन यावेळी महामंडाळाच्यावतीने करण्यात आले.