सोलापूर

सोलापूर : डॉक्टरांच्या कारमध्ये सापडली 29 लाखांची रोकड

मोहन कारंडे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : जोडभावी पोलिसांनी तुळजापूर नाक्याच्या ब्रिज खाली एका कारमध्ये 29 लाख 50 हजारांची रक्कम पकडली. ही रक्कम वसंत विहार येथील स्पर्श हॉस्पिटलचे डॉ. आनंद मुदकण्णा यांची होती. पोलिसांनी आयकर विभागाला बोलावून माहिती दिली. ही रक्कम ट्रेझरी शाखेत भरण्यात आल्याची माहिती जोडभावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी दै.'पुढारी'शी बोलताना दिली.

मागील महिन्यात सोलापुरातील काही हॉस्पिटल व खासगी डॉक्टरांच्या रुग्णालयावर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. त्यामुळे शहरातील डॉक्टरी व्यवसाय करणार्‍यांमध्ये धडकी भरली होती. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी जोडभावी पोलिसांना माहिती मिळाली की, एका डॉक्टरांच्या कारमध्ये रोकड घेऊन दोघे जण सोलापूरकडून लातूरकडे जाणार आहेत. तेव्हा जोडभावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत व त्यांचे पथक हे तुळजापूर नाक्याच्या ब्रिजखाली दबा धरून बसले. तेव्हा त्यांना एमएच13/डीव्ही 1786 या क्रमांकाची संशयित कार पोलिसांना पाहून हळूहळू जाऊ लागली. तेव्हा पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी ती कार अडविली व त्या कारची तपासणी केली असता, त्या कारमध्ये नोटाचे ढीग दिसून आले.

लगेच पोलिसांनी जागेवर पंचनामा केला. ती कार व कारमधील दोघे यांना घेऊन जोडभावी पोलिस ठाणे गाठले. तर कारमध्ये त्यांचे मॅनेजर सय्यद व चालक क्षीरसागर हे दोघे होते. या दोघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी ती कारही वसंत विहार येथील स्पर्श हॉस्पिटलचे डॉ. आनंद मुदकण्णा यांची असल्याचे पोलिसांना सांगितले. त्या कारमध्ये पोलिसांना 29 लाख 50 हजार रुपये होते. यावेळी पोलिसांनी ही माहिती आयकर विभागास कळविली.

या घटनेबाबत बोलताना जोडभावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत म्हणाले, आम्हाला तुळजापूर नाक्याच्या ब्रिजखाली कार संशयितरित्या जाताना दिसल्याने आम्ही ती कार थांबवून त्याची तपासणी केली. त्यावेळी त्या कारमध्ये 29 लाख 50 हजार रुपये होते. आम्ही या बाबत आयकर विभागाला कळविले आहे. तसेच ती कार वसंत विहार येथील डॉ. आनंद मुदकण्णा यांची असल्याचे समजले. त्या कार मध्ये स्पर्श हॉस्पिटलचा मॅनेजर सय्यद व कारचा चालक क्षीरसागर या दोघांची सखोल चौकशी केली. तेव्हा दोघांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांना नोटीस देवून सोडण्यात आले. तसेच ती 29 लाख 50 हजाराची रक्कम ही ट्रेझरी शाखेत भरण्यात आली आहे. यानंतर पुढील कारवाई ही आयकर विभाग करीत आहे. एवढी रक्कम कोठून कशी आली. याची कागदपत्रे स्पर्श हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आयकर विभागास दाखवावी लागेल, असेही पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी सांगितले. या कारवाईमुळे शहरात उलट-सुलट चर्चा झाली. अनेकांनी डॉक्टरांकडे सापडलेल्या रकमेबाबत आश्चर्य व्यक्त केले.

SCROLL FOR NEXT