सोलापूर

सोलापूर : जिल्ह्यात 179 गावांत स्मशानभूमीची वानवा

अमृता चौगुले

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 179 गावात स्मशानभूूमीची वणवा आहे.89 गावात जागेअभावी तर 30 ठिकाणी स्मशानभुमीला जाण्यासाठी जागा नाही. 60 ठिकाणी वाद सुरु आहेत. काही प्रकरणे न्यायालयीन स्तरावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावात मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी मरण यातना भोगाव्या लागत असल्याचे चित्र आहे.

एकीकडे स्वातत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे मृत्यू नंतरही समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावातील लोकांना मुलभूत सेवा सुविधा निर्माण करुन देणे हे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचे काम आहे तर यामध्ये कायदेशीर आडचणी निर्माण झाल्यास तसेच जागा उपलब्ध नसल्यास त्याची जबाबदारी महसुल प्रशासनाने घेणे आवश्यक असून त्यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी संबधित गावात स्मशानभूमीसाठी जागा उपबल्ध करुन देणे आवश्यक आहे. उपलब्ध जागेवर निवारा शेड निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेने निधीची उपलब्धता करुन देणे आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्या ठिकाणी पोलिस प्रशासनाने सहकार्य करण्याची गरज आहे.

मात्र जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेतील समन्वयाचा अभाव असल्याने गेल्या 75 वर्षात ही या मुलभूत समस्या सुटल्या नाहीत.त्यामुळे याची आता जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी तातडीने दखल घेवून या गावातील स्मशानभूमीची समस्या तातडीने सोडविणे अपेक्षित आहे.जिल्ह्यातील ज्या ज्या गावात स्मशानभूमी नाही त्या त्या ठिकाणचे प्रस्ताव तहसीलदार आणि गटविकास अधिकार्‍यांना तसेच तालुका पोलिसांना पाठवून दिले आहेत.मात्र त्यासाठी योग्य प्रतिसाद मिळत नाही.त्यामुळे या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत.यावर आता जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील सहा गावात स्मशानभुमीची आडचणी असून यामध्ये दोन ठिकाणी रस्ता तर चार ठिकाणी जागा उपलब्ध नाही. मोहोळ तालुक्यातील सात गावात समस्या असून त्या ठिकाणी ही 4 ठिकाणी रस्ता तर 7 ठिकाणी जागा उपलब्ध नाही.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील 3 ठिकाणी समस्या असून 1 ठिकाणी रस्त्याचा वाद तर 2 ठिकाणी जागा उपलब्ध नाही. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे रस्त्याचा वाद आहे तर 6 ठिाकणी जागा उपलब्ध नाही, माळशिरस तालुक्यातील 5 ठिकाणी रस्त्याचा तर 11 गावात जागा उपलब्ध नाही, अक्कलकोट तालुक्यातील आठ ठिकाणी रस्त्याचा वाद आहे तर 12 गावात स्मशानभूमीसाठी जागेचा शोध सुरु आहे.करमाळा तालुक्यातील 6 ठिकाणी रस्त्याचा तर 16 गावात जागेचा शोध सुरु आहे.माढा तालुक्यातील 3 ठिकाणी रस्त्याचा तर 5 ठिकाणी जागेचा शोध सुरु आहे.बार्शी तालुक्यात 20 गावात अद्याप ही स्मशानभुमीसाठी जागा उपलब्ध झालेली नाही.तर मंगळवेढा तालुक्यातील 7 गावात स्मशानभूमीसाठी जागेचा शोध सुरु आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून डीओ पत्र
यापैकी काही आडचणी सोडविण्याचे अधिकारी मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांना आहेत तर काही ठिकाणी तालुका पोलिस ठाणे, संबधित तालुक्याचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी एकत्रित जावून कार्यवाही करावी लागणार आहे.त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून डीओ लेटर अर्थात स्मरणपत्र दिलेले आहे. तरीही यावर पुढे कोणतीही कार्यवाही होत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी आता यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

स्मशानभूमीसाठीच्या समस्या
सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 30 गावात स्मशानभूमीसाठी रस्ताच नाही त्यासाठीचा वाद सुर आहे तर 89 गावात स्मशानभूमीसाठी जागाच नाही. 60 गावांमध्ये स्मशानभूमीसाठीच्या जागेचा वाद सुरु आहे.त्यामुळे अशा ठिकाणी ओढ्याच्या कडेला किंवा नदीच्या कडेला अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे.प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे.

लवकरच संयुक्‍त बैठक ः जिल्हाधिकारी शंभरकर
या संदर्भात लवकरच पोलिस, जिल्हा परिषद आणि महसूल विभागाची संयुक्तीक बैठक घेवून विषय मार्गी लावू तसेच ज्या ज्या ठिकाणी शासनाची जागा उपलब्ध आहे त्या त्या ठिकाणी तातडीने जागा उपलब्ध करुन देवू अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT