सोलापूर , पुढारी वृत्तसेवा : टाळ, मृदंग, ढोल, ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षार्ंनंतर आषाढी वारीचा सोहळा निर्बंधमुक्त होत आहे. सहा जूनला गजानन महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झाले आहे. पाच जिल्ह्यांचा प्रवास करत साडेसातशे किलोमीटरचे अंतर कापत 700 भाविक पायी चालत अत्यंत शिस्त व संयमी पद्धतीने पालखीचे सोलापुरात आगमन झाले.
पालखीसमोर भालदार, चोपदार, अश्वावर विराजमान होते. हजारो सेवेकरी, वारकरी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करुन डोक्यावर पांढरी टोपी व कपाळावर टिळा हातात भगवे झेंडे घेतलेले वारकरी टाळ वाजवत विठ्ठल नामाचा गजर करत 'गण गण गणात बोते' या गजराने अवघा परिसर दुमदुमला होता. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गजानन महाराजांची पालखी सोलापुरात दाखल होताच सोलापूरवासीयांकडून पालखीचे अत्यंत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. दोन दिवस मुक्कामी असलेल्या गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्तगण, वारकरी सोलापुरात दाखल झाले होते.
शेगाव येथून पंढरपूरला निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे रविवारी सम्राट चौक येथे श्री सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरात आगमन होताच या ठिकाणी श्री सद्गुरू प्रभाकर महाराज व श्री संत शेगाव गजानन महाराज यांच्या पालखीचा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. याप्रसंगी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.त्यानंतर बारा वाजता मंदिर ट्रस्टच्यावतीनेेे गजानन महाराजांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. गजानन महाराजांना पिठले व भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला.
संत गजानन महाराजांच्या पालखीचे 'गण गण गणात बोते' म्हणत तसेच विठुरायाच्या जयघोषात हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. मंदिर ट्रस्टकडून वारकर्यांना व भक्तगणांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आलेे.
पालखीमार्गावर अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून पालखीमार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.