सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेकठिकाणी लागणारा मुरूम कोंडी परिसरातील शासकीय जमिनीतून उचलण्यात येत आहे. याविषयी ग्रामस्थांनी तलाठी, मंडल अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही यावर निर्बंध आणले जात नाहीत. त्यामुळे कोंडी येथील ग्रामस्थ शिवाजी भोसले यांनी प्रांताधिकारी तसेच गौण खनिज विभाग यांच्याकडे लेखी तक्रार केली असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
चिंचोळीकाटी एमआयडीसी परिसरातील अनेक कंपन्यांना लागणारा मुरुम हा कोंडी परिसरातून उचलला जात आहे. यामध्ये प्रशासनाला कोणत्याही प्रकारची रॉयल्टी भरली जात नाही तसेच पूर्वपरवानगी घेतली जात नाही.
मुरुम विक्री करणारे आणि ज्यांना मुरुम लागणार आहे, अशा मंडळींनी तलाठी आणि मंडल अधिकार्यांशी संगनमत केले आहे. त्यामुळे राजरोसपणे मुरम उपसा होऊनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे कोंडी परिसरात अनेकठिकाणी या सततच्या मुरूम उपशामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे जनावरांसह मानवासही धोका निर्माण झाला आहे.
अनेक वेळा या प्रकाराची तक्रार केली असताना तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी येऊन केवळ चौकशी केल्याचा आणि पंचनामा केल्याचा फार्स केला आहे. त्यांच्या पंचनाम्यानंतरही मुरुम उपसा सुरूच आहे. त्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे.
दुसरीकडे शासकीय जमिनीवरील मुरूम विक्री करुन काही मंडळी लाखो रुपये कमवत आहेत. त्यामुळे हा प्रकार तातडीने थांबवावा; अन्यथा याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा कोंडीचे ग्रामस्थ शिवाजी भोसले यांनी गौण खनिज विभाग आणि प्रांताधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीमध्ये दिला आहे.