सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (दि. 7) 272 ट्रक कांद्याची आवक झाली आहे. यावेळी चांगल्या कांद्याला प्रतिक्विंटल सहा हजारांचा भाव मिळाला. मागील काही दिवसांपासून सरासरी तीन हजार रुपयांचा दर मिळत आहे.
बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा आदी भागांतील नवा कांदा मार्केट यार्डात आला आहे. महाराष्ट्रातून इंदापूर, म्हसवड, माळशिरस, माढा, अक्कलकोट तालुक्यांसह इतर भागातील जुन्या, नव्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.
यंदाच्या वर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने हिवाळ्यात कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदाला व्यापार्यांकडून मोठी मागणी होत आहे. मागणी वाढल्याने दरातही मोठी वाढ झाली आहे. कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य 800 डॉलर केले आहे. त्यामुळे कांद्याच्या भावामध्ये घसरण झाली आहे. शेतकर्यांना दोन पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर केंद्राकडून अशाप्रकारचे निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे शेतकर्यांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. यंदा पाऊस नसल्याने कांद्याचे अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. कांद्याचे उत्पादन कमी असल्याने भाववाढीवर त्याचा फासरा परिणाम होणार नसल्याची चर्चाही बाजारात सुरू आहे.
कांद्याला चांगली मागणी आहे, मात्र आवक कमी-जास्त होत आहे. येत्या काही दिवसांत कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. मंगळवारी 272 ट्रक कांद्याची आवक झाली आहे. मागील आठवड्यापेक्षा आज दर कमी झाले आहेत. आवक आणखी वाढली तर दरामध्ये घट होईल.
– नविद वैरागकर, आडते
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.