सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील अंतर्गत रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे उद्योजक-कामगारांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. ही बाब चव्हाट्यावर येऊनदेखील कार्यवाही झाली नव्हती. पण आता एका उद्योजकाने एमआयडीसीच्या विभागीय कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर महापालिकेची यंत्रणा हलली आहे. महापालिकेने 13 अंतर्गत रस्त्यांचे पूर्वगणनपत्रक तयार केले आहे.
अक्कलकोट रोड एमआयडीसी ही पूर्वी शहराबाहेर होती. सन 1992 मध्ये शहर हद्दवाढमुळे ही एमआयडीसी शहरात समाविष्ट झाली. शहर हद्दीत आल्यावर या औद्योगिक वसाहतीमधून महापालिकेला मिळकत रूपात उत्पन्न मिळत असले तरी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. सर्वच अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अनेक रस्ते खड्डेमय झाले असून पावसामुळे याठिकाणी चक्क दलदलीचे स्वरूप आलेले आहे. या मार्गांवरून उद्योजक-कामगारांना ये-जा करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. खराब रस्त्यांमुळे याठिकाणी अपघात होत आहेत.
या रस्त्यांप्रश्नी उद्योजकांनी केलेल्या तक्रारींची महापालिकेने दखल घेतली नाही. मनपाने निधीची अडचण सांगितली. यावर तत्कालीन उद्योगमंत्री व पालकमंत्र्यांनी एमआयडीसीने रस्त्यांचे नूतनीकरण करावे व यथावकाश मनपाकडून रक्कम वसूल करावी, असा सुवर्णमध्य काढला होता. मात्र तो मनपाला अमान्य होता. या पार्श्वभूमीवर एका उद्योजकाने एमआयडीसीच्या विभागीय कार्यालयाकडे तक्रार केली. यावर या कार्यालयाने महापालिकेला पत्र पाठवून या कामाची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगितले. यावर मनपाची यंत्रणा हलली अन् 13 रस्त्यांचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र पुन्हा निधीचाच मुद्दा मनपाने उपस्थित केला आहे, हे विशेष. निधीची अडचण दूर झाली तरच रस्ते होणार; अन्यथा उद्योजक-कामगारांचा वनवास सुरूच राहणार आहे.
रस्त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने महापालिकेने 13 रस्त्यांचे 9.82 कोटींचे पूर्वगणनपत्रक तयार करून ते एमआयडीसीला पाठविले आहे. एमआयडीसी अथवा शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा, असे महापालिकेचे म्हणणे आहे. निधी उपलब्धीनंतरच रस्त्यांची कामे होणार आहेत, असे महापालिकेने रस्त्यांबाबत तक्रार केलेल्या उद्योजकाला कळविले आहे.