सोलापूर

सोलापूर : अल्पवयीन मुलीला आईनेच ढकलले वेश्या व्यवसायात

अमृता चौगुले

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा : आईने स्वतःच्या अल्पवयीन मुलीस वेश्या व्यवसात ढकलले. तिचे ज्याच्याशी अनैतिक संबंध होते त्याच्याशी मुलीचे लग्न लावून दिले. याप्रकरणी मुलीने विजापूर नाका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुलीची आई, नवरा व सासू, अशा तिघांविरुद्ध बलात्कार व त्याला सहाय्य केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला.

या घटनेतील 14 वर्षांची पीडिता ही आई, वडील, लहान बहीण यांच्यासह पुण्यात राहात होती. आई-वडिलांचे सतत भांडण होत होते. त्यामुळे आई नवर्‍यास सोडून दोन मुलींना घेऊन सोलापुरात राहण्यास आली. सोलापूर हे त्या महिलेचे माहेर आहे. सोलापुरात त्या मुलीच्या आजीचे घर जेथे होते त्याच्या शेजारीच त्यांनी भाड्याने घर घेतले. त्या घरात ती मुलगी आई व बहिणीसह राहू लागली. सोलापुरात आल्यावर त्या मुलीच्या आईचे एका दुसर्‍या पुरुषाबरोबर अनैतिक संबंध जुळले. थोड्या दिवसांनी तो पुरुषसुद्धा त्यांच्या घरात येऊन राहू लागला. त्याचे राहणे हे त्या दोन मुलींना पटत नव्हते. मोठी मुलगी (वय 14) ही आईला सांगायची की, या माणसाला घरात ठेवून घेऊ नकोस, नाहीतर मी निघून जाते. पण आईला तिचे काही पटले नाही. त्यामुळे आईने त्या मुलीस बार्शी येथील तिच्या मैत्रिणीकडे ठेवले. तेथे गेल्यावर त्या 14 वर्षांच्या मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. याविषयी जेव्हा त्या मुलीने आईकडे तक्रार केली तेव्हा तू तेथेच राहा, तू पळून जाण्याचा प्रयत्न केला तर ते लोक तुला मारून टाकतील, अशी धमकी दिली. त्यामुळे ती अल्पवयीन मुलगी तेथेच राहिली. दरम्यान, सोलापुरातील एक तरुण बार्शी येथे त्या मुलीकडे गेला. त्या दोघांमध्ये बोलणे झाल्यावर त्या मुलाने तिची तेथून सुटका करून तिला सोलापुरात स्वत:च्या घरी आणले.

मी या मुलीवर प्रेम करतो, मला हिच्याशी लग्न करावयाचे आहे, असे त्या मुलाने आई-वडिलांना सांगितले. तेव्हा त्या मुलाच्या आई-वडिलांनी त्या मुलीचे वय कमी आहे, तू मोठी झाल्यावर तुझे लग्न लावून देतो, तोपर्यंत तू तुझ्या आईकडे राहा, असे सांगितले; परंतु त्या मुलीने स्वतःच्या आईकडे जाण्यास नकार दिला.

काही दिवसांनी त्या मुलीची आई ही त्या मुलाच्या घरासमोरून जात होती. त्यावेळी तिला तेथे स्वतःची मुलगी दिसली. तेव्हा त्या मुलीच्या आईने त्या मुलाच्या आई-वडिलांना सांगितले की, मुलीला एका दिवस घेऊन जाते व नंतर आणून सोडते, असे सांगून त्या मुलीस घेऊन गेली. त्यानंतर आईने स्वतःचे ज्या पुरुषाबरोबर अनैतिक संबंध होते त्याच्या घरी मुलीला नेले. मला वेश्या व्यवसायातून ज्या मुलाने सोडविलेल्याच मुलाशी मी लग्न करणार आहे, असे ती मुलगी सांगत होती. पण आईने तिचे न ऐकता, त्या पुरुषाबरोबर तिचे लग्न जबरदस्तीने लावून दिले. लग्नानंतर त्या मुलीला मारहाण सुरू झाली. तो नवरा म्हणणारा नेहमी तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने त्या मुलीवर बलात्कार करू लागला.

त्यानंतर ते दोघे अकलूज येथे राहण्यास गेले. तेव्हा नवरा कामाला गेल्यावर ती मुलगी एकटीच असताना ती घरातून बाहेर गेली व थेट अकलूज-सोलापूर एस.टी. बसने सोलापुरात आली. त्यानंतर तिने विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले. तेथे तिने आई, नवरा व सासू या तिघांविरुद्ध फिर्याद दिली. यावरून त्या अल्पवयीन मुलीची आई, नवरा व सासू या तिघांविरुद्ध बलात्कार व त्याला सहकार्य केल्याबाबत गुन्हा दाखल झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT