सोलापूर

सोलापूर-अक्‍कलकोट : उद्योग, व्यवसायवाढीचा ‘महामार्ग’

अमृता चौगुले

सोलापूर : जगन्नाथ हुक्केरी :  सोलापूर-अक्‍कलकोट या 39.6 कि.मी. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून सुरुवातीपासूनच उद्योग, व्यवसायवाढीबरोबरच कृषी, पर्यटन, धार्मिक पर्यटनाला हा महामार्ग चालना देत आहे.

तसे पाहिले तर आता सोलापूर मल्लिकार्जुननगर, शिक्षक सोसायटी, गोदूताई परुळेकर विडी घरकुलसह अन्य वसाहतींमुळे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) हद्दीपर्यंत पोहोचले आहे. अशात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत आल्याने सोलापूर आणि अक्‍कलकोट अंतर कापण्यासाठी कालावधी कमी लागत आहे. रस्ता मोठा आणि मोकळा बनल्याने व जाण्या-येण्यासाठी दोन मार्ग असल्याने अडथळा होत नाही. यामुळेच फायदा होत आहे. अक्‍कलकोट नवीन नाका ओलांडल्यानंतर हॉटेल थाटत आहेत. या माध्यमातून युवकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला काम मिळत आहे. कुंभारी, तोगराळी, लिंबीचिंचोळी, वळसंग, कर्जाळ, कोन्हाळ्ळी त्यानंतर अक्‍कलकोट हद्दीत अनेक हॉटेल आणि लॉजच्या रूपात विश्रामधाम उभे राहिले आहेत.

याचा फायदा स्वामी समर्थ, गाणगापूरच्या दत्तांच्या दर्शनाला जाणार्‍या भाविकांबरोबरच अक्‍कलकोटमार्गे अफजलपूर, आळंद, कलबुर्गीसह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात जाणार्‍या भाविकांना होत आहे. अलीकडील काळात गौडगाव बु येथील जागृत हनुमान मंदिर, कुंभारीचे ग्रामदैवत गेनसिद्ध महाराज, यत्नाळचे बाल हनुमान, कोन्हाळ्ळीची यल्‍लम्मा देवी, हैद्रा दर्गा, नागणसूर येथील विरक्‍त व बमलिंगेश्‍वर मठ, सलगरचे हनुमान मंदिर, वागदरीतील परमेश्‍वर मंदिर, मैंदर्गी हिरेमठ संस्थान, विरक्‍त मठ, सिद्धरामेश्‍वर, शिवचलेश्‍वर मंदिर, हालहळ्ळी (अ) येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथे महात्मा गांधी यांनी भेट दिलेले शंकरलिंग मंदिर, हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांचे निवास व हुतात्मा स्तंभ, बाळबट्टल यात्रेसाठी प्रसिद्ध असलेले चौडेश्‍वरी मंदिर, तीर्थ येथील श्रीराम, लक्ष्मण, भरत, सीता मंदिरे, जलकुंड, अक्‍कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर, समाधी मठ, राजेराय मठासह ऐतिहासिक राजवाडा येथे भेट देण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

इच्छित ठिकाणी जाताना व परत येताना भाविक जेवण आणि विश्रांतीसाठी थांबत आहेत. यामुळे हॉटेल व्यवसायाला बरकत आली आहे. बहुतांश भाविक दर्शन करून परत येताना रस्त्यात थांबून भोजन करतात. यामुळे थाटलेल्या हॉटेलना ग्राहक मिळत आहेत. नाष्ट्यासाठी छोटे-छोटे कॅन्टीनवजा हॉटेलही निर्माण होत आहेत. यात पोहे, वडा-पाव, पावभाजीसह नाष्ट्यांचे पदार्थ मिळत आहेत. शीतपेये, लस्सी, ताक, मठ्ठा, उसाचा रस, ज्यूस सेंटर, फॅब्रिकेशन, ऑनलाईन सुविधा केंद्र, रुमाल, टॉवेल, साबण, कपडे विक्रीच्या माध्यमातून रोजगार निर्माण होत आहे. यामुळे हा मार्ग सध्या सधनता निर्माण करण्याबरोबरच प्रगतीचा राजमार्ग ठरला आहे.

सोलापूर-अक्‍कलकोट महामार्गावर अनेक महत्त्वाची गावे, ऐतिहासिक, धार्मिक स्थळे आहेत. हा रस्ता कर्नाटक आणि आंध्र प्रदेशला जोडणारा दुवाही आहे. यामुळे नेहमीच या मार्गावर वर्दळ असते. राष्ट्रीय महामार्गाच्या निधीतून या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आल्याने या रस्त्याच्या परिसरात असलेल्या गावांतील नागरिकांचे भाग्य उजळले आहे.

'गड्या, आपला गावच बरा…'

अवेळी पडणारा पाऊस, आतबट्ट्यात गेलेली शेती, रोजगाराची साधने उपलब्ध नसल्याने पोट भरण्यासाठी या भागातील नागरिक पुणे, मुंबई, बंगळुरु, हैदराबादसह अन्यत्र स्थलांतरित झाले होते. कोरोनामुळे स्थिती बिकट झाली आणि सोलापूर-अक्‍कलकोट महामार्गामुळे त्यांना आपल्या गावाकडील उद्योगधंदे खुणावत असल्याने ते 'गड्या, आपला गावच बरा', असे म्हणत परतीच्या मार्गाला लागले आहेत. बहुतांशजणांनी या रस्त्याच्या कडेला व्यवसाय सुरू करून रोजगाराचा श्रीगणेशा केला आहे.

कृषी पर्यटनात वाढ

दर्शन किंवा अन्य कामांसाठी बाहेरून येणार्‍यांना सोलापूर-अक्‍कलकोट महामार्गावर असलेल्या शेतीतील विविध प्रयोग खुणावत आहेत. या भागातील विविध फुलांसह फळ पिके, जिरेनियम शेतीचे आकर्षण वाढत असून यातून कृषी पर्यटन वाढून यातही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. विविध रोपांच्या नर्सरी थाटल्या जात असल्याने शेतकर्‍यांना बाजारात जाऊन मालाची विक्री न करताच जागेवरच रोपांची विक्री करता येत आहे. यामुळे त्यांच्या वाहतुकीचा खर्चही वाचत आहे.

रस्त्याच्या कडेलाच शेती आहे. यात विविध फळ पिके घेत आहोत. ते पाहण्यासाठी व माहिती घेण्यासाठी नागरिक येत आहेत. त्यांना आम्ही मोफत माहिती देत आहोत. भविष्यात कृषी पर्यटन केंद्र सुरू करणार आहोत.
– गजानन होनराव
प्रयोगशील शेतकरी, कुंभारी
बेकारीवर महामार्ग पर्याय निघाला आहे. हॉटेल सुरू केल्याने रोज हातात पैसा खेळत आहे. यामुळे स्थानिक पातळीवरच रोजगार मिळाल्याने रोजगारासाठी सुरू असलेली धडपड थांबली.
– मल्लिकार्जुन बिराजदार
हॉटेल व्यावसायिक, अक्‍कलकोट

पूर्वीपासून हॉटेल आणि रसपानगृह आहेच. रस्त्याचा विस्तार झाल्याने ग्राहकांची संख्या वाढल्याने उत्पन्‍नवाढीसाठी फायदा झाला आहे. यामुळे हॉटेलचा विस्तार करावा लागला.
– पै. अनिल कोरे
व्यावसायिक, लिंबीचिंचोळी

काम नसल्याने लोक बाहेरगावी कामाला जात होते. रस्त्याच्या विस्तारीकरणामुळे रोजगाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. रस्त्यामुळे स्थानिक पातळीवर कामे उपलब्ध होत आहेत.
– वीरेंद्र हिंगमिरे
संचालक, मंगल भांडार

SCROLL FOR NEXT