पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : उजनी व वीर धरणांतून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे पंढरपूर येथील चंद्रभागा नदी दुथडी भरुन वाहत आहे. या पाण्यामुळे चंद्रभागेला पूर आला आहे. या पुरात नागरिक निष्काळजीपणे उतरत असल्याने वाहून गेल्याच्या घटनादेखील घडत आहेत. जीवितहानी होऊ नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापनालादेखील गुंगारा देत नागरिक सेल्फी घेण्यासाठी पाण्यात उतरत असल्याने जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुराच्या पाण्यात उतरुन सेल्फी घेणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
चंद्रभागा नदीला आलेल्या पूरात मागील चार दिवसापूर्वी एकजण वाहून गेला आहे. तर दोन महिलांना आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचार्यांनी बुडताना वाचवत जीवदान दिले आहे. अशा घटना घडत असताना देखील शहरातील नागरिक तसेच श्रावण मासानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आलेले भाविक स्नान करण्यासाठी नदीपात्रात , घाटावर उतरत आहेत.स्नान झाल्यानंतर सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाहीत. तर नदीकिनारी ठिकठिकाणी नागीरक येत असून सेल्फी घेण्यासाठी पूराच्या पाण्यात उतरुन सेल्फी घेत आहेत. त्यामुळे जीवित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. चार दिवसांपूर्वी चंद्रभागेची खाना नारळाने भाविकाने भरलेल्या ओटीतील नारळ आणण्यासाठी पाण्यात गेलेला शेट्टी बंदपट्टे हा युवक वाहून गेला होता. त्याचा मृतदेह चौथ्या दिवशी मुंढेवाडी शिवारात सापडला आहे. तर दोन दिवसांपूर्वी चंद्रभागेच्या पुरात पुलावरुन उडी मारलेल्या दोन महिलांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने वाचवले आहे. अशा घटना घडू लागल्याने प्रशासनाने महत्त्वाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कार्यरत ठेवले आहे.
या आपत्ती व्यवस्थापन पथकाला गुंगारा देत काही नागरिक मंगळवार दि. 16 रोजी दुपारी 3 वाजता नवीन पुला जवळ असलेल्या व पाण्यात बुडालेल्या दगडी पुलाजवळील भराव्यावर उभा राहून सेल्फी घेत होते. त्यांना पाहून अनेकांनी तिकडे सेल्फी घेण्यासाठी मोर्चा वळवत असल्याचे दिसत आहे.
नवीन पूल बनला सेल्फी पॉईंट
चंद्रभागेला 25 हजार क्युसेकचा विसर्ग आला की दगडी पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे येथील नवीन पूल वाहतुकीसाठी नेहमी सज्ज असतो. याच उंच पुलावर जाता-येता नागरिक वाहने थांबवून सेल्फी घेत आहेत. सेल्फी घेण्यासाठी पुलाच्या लोखंडी कठड्यावर चढत आहेत. एकाचे बघून दुसरा लगेच सेल्फी घेण्यासाठी थांबत असल्याने सद्या नवीन पूल सेल्फी पॉईंट ठरत आहे. येथे सेल्फीसाठी होणारी गर्दी थांबवण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.