सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सिद्धेश्वर तलावाभोवती स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनकडून छानसे वृक्षारोपण करण्यात येऊन जागोजागी हिरवळ निर्माण केली आहे. ट्रॅकवर फरशीकरण करण्यात आले आहे. हे सगळे सुशोभिकरण काहीकाळ नेत्रसुखद वाटत होते. सध्या त्याठिकाणी प्रचंड अस्वच्छता दिसून येत आहे. याकडे संबंधित अधिकार्यांनी त्वरित लक्ष देण्याची मागणी सोलापूरकर करत आहेत.
गणपती घाटावर असलेल्या निर्माल्य कुंडाभोवती अक्षरशः कचर्याचे ढीग साठले आहेत. अनेकदा तेथे खरकटे अन्नही टाकलेले आढळून येते. तेथूनच थोडे पुढे म्हणजे डाव्या बाजूस गेल्यावर मधोमध असलेल्या गोलात लॉन करण्यात आले आहे. हे लॉन व त्यामध्ये लावण्यात आलेले झाड अक्षरशः पाण्याअभावी वाढेनासे झाले आहे. त्यापुढे गेल्यावर झाडांच्या फळांचा कचरा व त्यावरुन नागरिकांची झालेली वर्दळ यामुळे जागोजागी फरशीवर डाग पडले आहेत. त्याठिकाणी त्या फळांचा कचरा तसाच साठून असतो. तो साफच करण्यात येत नाही. यामुळे त्या कचर्यातूनच वाट काढत नागरिकांना चालावे लागते.
तेथून पुढे गेल्यावर चिमुकल्यांना खेळण्यासाठी काही खेळणी उभारण्यात आली असून त्याठिकाणी रबरी मॅटिंग केले आहे. त्या मॅटिंगवर नेहमीच झाडांचा कचरा दिसून येतो. पालापाचोळा, झाडांच्या नासक्या फळांचे डाग, धूळ याठिकाणी दिसून येते. मॉर्निंग वॉकला आलेले नागरिक व त्यांच्यासोबत आलेले चिमुकले तेथे खेळण्यासाठी थांबतात. परंतु तेथील अस्वच्छता पाहून ना मोठ्यांना तेथे थांबावेसे वाटते, ना चिमुकल्यांना तेथे खेळण्याची इच्छा होते. याच भागात छोटी-मोठी अनेक कुत्रीही आहेत. त्याकडे तेथील सुरक्षारक्षकांचे कायम दुर्लक्ष झालेले दिसते. ही कुत्री चिमुकल्यांचा अंगावर येतात. मॉर्निंग वॉकच्या वेळी रनिंग करणार्यांच्या अंगावर धाऊन जातात. ही कुत्री फिरण्याच्या टॅ्रकमध्ये मलमूत्र विसर्जन करतात. यामुळे त्या परिसरात एकप्रकाची दुर्गंधी असते.
या ट्रॅकवर थोेडे पुढे गेल्यावर ट्रायटेनचे डब्बे उभारलेले दिसतात. त्याभोवती काही सुरक्षारक्षक बसलेले असतात. पण त्यांचे ट्रॅककडे लक्ष कमी व त्यांच्या हातातील मोबाईलमध्येच त्यांना जास्त रस असतो. त्यामुळे ट्रॅकच्या सुरक्षेकडे त्यांचे दुर्लक्ष दिसते. याच परिसरात तळ्यामध्ये संगीत कारंजे बसवले होते. ते ही सध्या बंद आहे. त्याचे कारण तेथील कर्मचार्यांना विचारले असता आम्हाला काय माहिती नाही, असे उत्तर ते देतात.
त्याच मार्गाने थोडे पुढे गेल्यावर म्हणजे संमती कट्ट्यापासून पुढील बाजूसही कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसतो. याठिकाणी वरीलप्रमाणेच जागोजागी कुत्र्यांच्या मलमुत्राचे किळसवाणे दर्शन होते. स्वच्छतेचा अभाव व स्वच्छतेकडे दुर्लक्ष यातूनच सिद्ध होते. आणखी पुढे गेल्यावर खंदक बागेकडे वळण्याच्या डाव्या बाजूस असलेल्या लॉनवर अनेकदा कुत्री लोळत पडलेली दिसतात. तेथील हिरवाईही पाण्याअभावी सुकून गेल्यासारखी दिसत आहे. त्याच मार्गाने आणखी पुढे गेल्यावर उजव्या बाजूस एक लोखंडी टपरीवजा खोके ठेवले आहे. हे अतिक्रमण तेथे कसे झाले. झाडांमध्ये, हिरवळीवर हे लोखंडी खोकेवजा टपरी कुणी आणून ठेवली याविषयी सुरक्षारक्षकांकडे अजिबात उत्तर नाही. या भागापासून गणपती घाटाकडे जाईपर्यंत जागोजागी अस्वच्छता, पक्षी, प्राण्यांचे मलमूत्र ओलांडतच पुढे जावे लागते.
एकूणच सुंदर नटलेल्या तळ्याभोवती हे असले ओंगळवाणे प्रदर्शन किळसवाणे व शहराच्या सौंदर्यास बाधा आणणारे आहे. सकाळच्या वेळी या परिसरात फिरायला येणारे मुकाट्याने हा सारा प्रकार सहन करत आहेत. याठिकाणी असलेले सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक व संबंधितांचे मात्र आपल्या कर्तव्याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसते. यावर संबंधित अधिकार्यांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी सोलापूरकरांची आहे.
मी रोजच सिद्धेश्वर तळ्याभोवती मॉर्निंग वॉकला जात असतो. याठिकाणी हल्ली अस्वच्छता मोठ्या प्रमाणात जाणवते. यामुळे येथे सकाळच्यावेळी वॉकिंग करणे, व्यायाम करणे, श्वसनाची काही आसने करणे नकोसे झाले आहे.
– दिनेश क्षीरसागर
मी गेल्या अनेक वर्षांपासून तळ्याभोवती सकाळी फिरायला येत आहे. हल्ली येथे खूप छान सुशोभिकरण, वृक्षारोपण झाले आहे. अलीकडे मात्र येथील साफसफाई व सुरक्षेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्याचा त्रास होतो.
– संतोष वडीशेरला
तळ्याभोवती फिरताना सध्या कुत्र्यांचा त्रास अक्षरशः जीवघेणा वाटतो. कधी कुत्री अंगावर येतात, तर कधी जागोजागी कुत्र्यांनी केलेली घाण ओलांडत फिरताना नकोसे होते. संबंधित अधिकार्यांनी याकडे गंभीरपणे लक्ष द्यावे.
– आशुतोष लिमये