सोलापूर

साेलापूर : नियोजनाअभावी रस्त्यांसाठी ठेकेदारांकडून उदासीनता

अमृता चौगुले

बार्शी : गणेश गोडसे : दळणवळणाच्याद‍ृष्टीने तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख व प्रशासनाने टेंभुर्णी ते येडशी या 93 कि.मी. अंतराच्या राज्यमार्गाचे केंद्र शासन, राज्य शासन व संबंधित ठेकेदार यांच्या संयुक्त माध्यमातून 'बांधा, वापरा व हस्तांतरित करा' या धोरणावर चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.

या मार्गाच्या रुंदीकरणासाठी वारंवार निविदाही प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र तत्कालीन ठेकेदारांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. चौपदरीकरणाच्या अफाट खर्चामुळे ठेकेदारांमधून उदासीनता होती. मात्र पुणे येथील एका खासगी कंपनीने टेंभुर्णी ते येडशीदरम्यानच्या रस्त्याच्या रुंंदीकरण कामाचा ठेका घेतल्याने रुंदीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची चर्चाही रंगली होती. ऑक्टोबर 2013 मध्येच रस्ते रुंदीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याचा मुहूर्तही काढण्यात आलेला होता. संबंधित कंपनीकडून टेंभुर्णी-बार्शी-पांगरी ते येडशीदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मूळ मालकीच्या जागेच्या स्थान निश्‍चितीचे काम सुरू करून ते पूर्णही करण्यात आले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच जागेवर अनेकांनी आपली बांधकामे थाटल्याचे सध्याच्या सर्व्हेक्षणातून दिसत असून हीच जागा मोठमोठ्या बांधकामाच्याही पाठीमागे गेल्याचे निदर्शनास येते. रुंदीकरणासाठी प्रत्यक्षात शासन किती जागा ताब्यात घेणार, हे मात्र प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यानंतरच समजणार होते. तेवढ्यात हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने चौपदरीकरणाने वेगळेच वळण घेतले होते. टेंभुर्णी ते लातूर यादरम्यानचा कुर्डूवाडी ते कुसळंबदरम्यानचा चौपदरीकरणातील रस्ता सातारा-लातूर व पंढरपूर-खामगाव या दोन रस्त्यांसाठी एकच दुवा आहे. त्यामुळे हे मार्ग पूर्ण होण्यासाठी टेंभुर्णी ते लातूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मार्गी लागणे गरजेचे आहे.

अनेक वर्षांचा कालावधी उलटूनही टेंभुर्णी-लातूर रस्त्याचे भोग मात्र काही केल्या संपण्यास तयार नाहीत. केंद्रीय मंत्र्यांच्या घोषणेमुळे या रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत आशादायी वातावरण निर्माण झाले आहे. मंत्र्यांच्या घोषणेनुसार काम सुरू झाल्यास या मार्गाची अनेक वर्षांपासून सुरू असलेली अवहेलना संपण्यास हातभार लागणार आहे. स्व. विलासराव देशमुख यांची टेंभुर्णी-लातूर रस्ता चौपदरीकरणाची इच्छापूर्ती कधी होणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT