सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : शेगाव येथील श्री सद्गुरू गजानन महाराज देवस्थानचा पंढरपूर वारी पायी दिंडी सोहळा शहरात सकाळी दाखल झाला. गुरूवारी सकाळी शहराच्या हद्दीवर हिप्परगा येथे दाखल झालेल्या या पालखीचे स्वागत पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी केले. शहरातील रूपाभवानी मंदिराजवळ पालखीचे महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी प्रशासनाच्यावतीने स्वागत केले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते.
आषाढी वारीसाठी निघालेला श्री सद्गुरू गजानन महाराज देवस्थानच्यावतीने पंढरपूर पायी वारीचा दिंडी सोहळा गुरूवारी सकाळी शहरात दाखल झाला. हिप्परगा येथे प्रशासनाच्यावतीने दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यानंतर दिंडी सोहळा रूपाभवानी मंदिरमार्गे शहरात दाखल झाला. यावेळी पाणी गिरणीजवळ महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी विधिवत पूजा करुन पालखी सोहळ्याचे स्वागत केले. पालखी सोहळा जुना कारंबा नाका येथील प्रभाकर स्वामी मंदिरात विसावला. येथे पालखी सोहळ्यासाठी पिठल-भाकरीचा महाप्रसाद ठेवण्यात आला होता. दुपारच्या विसाव्यानंतर पालखी सोहळा शहरातील टिळक चौकमार्गे कुचन प्रशालेकडे मार्गस्थ झाला. पांढराशुभ्र वारकर्यांचा वेश आणि शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या या पालखी सोहळ्यात 500 पेक्षा जास्त वारकरी सहभागी झाले आहेत. या दिंडी सोहळ्यात जवळपास साडेआठशे भक्त सामील झाले आहेत. गुरूवार व शुक्रवारच्या मुक्कामानंतर पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना होणार आहे.