मंगळवेढा : पुढारी वृत्तसेवा : मंगळवेढा पोलिसांनी प्रवास तसेच विविध ठिकाणी दागिने लुटणार्या सातजणांच्या टोळीला गजाआड केले. त्यांच्याकडून तीन चोर्यांचे प्रकार उघडकीस आले असून, 4 लाख 80 हजार रुपयांचे 10 तोळ्यांचे दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्यासह टीमने ही कारवाई केली.
पाटील म्हणाल्या, यातील पहिल्या घटनेत चंद्रकला सुग्रीव दराडे (वय 52, रा. एसटी डेपो कॉटर्स) या 20 एप्रिल रोजी सोलापूर येथे बसमधून जात होत्या. त्यांच्या पिशवीत ठेवलेले दीड लाखाचा 3 तोळ्याचा नेकलेस, 1 लाखाचे 2 ग्रॅम कानातील जोड, 20 हजार रुपयांची 4 ग्रॅम वजनाची नथ, 10 हजार रुपयांचे 2 ग्रॅम पेडल, 10 हजारांचे 2 ग्रॅम मंगळसूत्र असे एकूण सहा तोळे सहा ग्रॅम वजनाचे 3 लाख 30 हजारांचे दागिने लांबविण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.चौकशीत प्रवासादरम्यान त्यांच्याशी चार महिलांनी जवळीक साधल्याचे लक्षात आले.
त्यावरून अंजली राम भुई, गीता बालाजी भोगी, कीर्ती शिनो भोई, ज्योति बालाजी भोगी (सर्वजण रा. मुकुंदवाडी, जि. औरंगाबाद) या चार महिलांना पोलिसांनी (कळंब, जि. उस्मानाबाद) येथे पकडले. त्यांनी संबंधित चंद्रकला दराडे यांचे दागिने लुटल्याची कबुली दिली. या चौघींनी लुटीचे सोने राहू उर्फ रवि उर्फ मल्लेश गजवार, रा. मुकुंदवाडी, जि. औरंगाबाद यांच्याकडे दिल्याचे सांगितले. ते सोन्याचे दागिने बदलापूर येथील दुकानातून हस्तगत करण्यात आले.
निरीक्षक माने म्हणाले, दुसर्या घटनेत फिर्यादी प्रियंका सुनील शिंदे (रा. पाठखळ) यांच्या घरी सोमनाथ हनुमंत शिंदे (रा. बेंबळे, ता. माढा) हा नातेवाईक म्हणून आला होता. त्याने खुल्या कपाटातील 12 ग्रामचे 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, 20 हजाराचे 4.250 ग्रॅम कानातील बेल, 20 हजाराचे 4.150 कानातील झुबे असा 1 लाखाचा सोन्याचा मुद्देमाल चोरून नेला होता.
तिसर्या घटनेत भाग्यश्री कोष्टी यांची आयुर्वेदिक औषधाच्या देवाण घेवाणातून मानकेश मनोहर लोणी (रा. उमदी, ता. जत) याच्याबरोबर ओळख झाली. त्यावेळी भाग्यश्री कोष्टी यांच्या गळ्यातील 50 हजार किंमतीची 10 ग्रॅमची चेन चेन छान दिसते, असे सांगितले. एका कार्यक्रमात घालण्यासाठी चेन मागून घेतली. कार्यक्रमानंतर ती परत न देता 'तुला काय करायचं ते कर', म्हणून टाळाटाळ केली यामुळे कोष्टी यांनी फिर्याद दाखल केली होती.
या प्रकरणी पोलिसांनी मानकेश लोणी याला उमदी येथून येथे ताब्यात घेतले. या तीनही गुन्ह्यात सातजणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 4 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे उपअधीक्षक पाटील व निरीक्षक माने यांनी सांगितले. या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे, कर्मचारी सलीम शेख, दयानंद हेंबाडे, मनसिद्ध कोळी, खंडप्पा हाताळे, श्रीमंत पवार, महेश पोरे, दत्तात्रय येलपले, पुरूषोत्तम धापटे, विठ्ठल विभूते, वैभव घायाळ यांनी सहभाग घेतला.