सोलापूर

बार्शी : उधारीचे पैसे मागितल्याने घर पेटवले

दिनेश चोरगे

बार्शी; पुढारी वृत्तसेवा : उधारीचे पैसे मागण्याच्या किरकोळ कारणावरून चौघांनी मिळून मध्यरात्री एकाच्या घरी जाऊन दुचाकीसह संसार उपयोगी साहित्य जाळले. यात तीन लाखांचे आर्थिक नुकसान केले. जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना श्रीपतपिंपरी (ता. बार्शी) येथे सोमवारी पहाटे घडली.

नानासाहेब चांगदेव ताकभाते (वय 42) यांच्या फिर्यादीवरून अर्जुन चांगदेव पवार, बापुराव ऊर्फ हरिचंद्र बबन ताकभाते, हणुमंत मनोहर ताकभाते तिघे (रा. श्रीपत पिंपरी, ता. बार्शी) तसेच एक अज्ञात अशा चौघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बापुराव ऊर्फ हरिचंद्र बबन ताकभाते याला अटक करून बार्शी न्यायालयात उभे केले असता बार्शी न्यायालयाचे तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.

नानासाहेब ताकभाते हे 2010 मध्ये भाड्याने ट्रॅक्टरचा व्यवसाय करीत होते. त्यांनी मनोहर ताकभाते यांच्या शेतात शेतीचे काम केले होते. या कामाचे 4 हजार 500 येणे बाकी होते. त्याशिवाय मनोहर यांच्याकडे 2016 मधील नानासाहेबांच्या किराणा दुकानाची उधारीचे 1500 रुपयेही येणे बाकी होते. 'तू मनोहर ताकभाते यांना उधारीचे पैसे का मागतो, तुला मरायचे का' अशी धमकी गावातील अर्जुन पवार व हरिचंद्र ताकभाते यांनी नानासाहेबांना रविवारी फोनवरून दिली होती. सोमवारी पहाटे गावातील अर्जुन पवार, बापुराव ताकभाते, हणुमंत ताकभाते व अनोळखी एक व्यक्ती हे सर्वजण नानासाहेबांच्या घरात येऊन शिविगाळ करू लागले. घरात घुसलेल्या चौघांनी घरातील कपड्यांना व दुचाकीला लाग लावली. हणमंत ताकभाते याने नानासाहेबांची पत्नी प्रियांका हिच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावले. पैसे मागितल्यास तुला जाळून टाकीन, अशी धमकी दिली. आगीत घरातील साहित्य जळून सुमारे 3 लाखांचे नुकसान झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT