सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून वृद्धावर चाकूने वार करून जखमी केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध नातेपुते पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दत्तात्रय रामचंद्र अवताडे (वय 65, रा. देशमुख वाडी, ता. माळशिरस) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रणजित पोपट काळभोर (वय 29, रा. देशमुख वाडी, ता. माळशिरस) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 जुलै रोजी सायंकाळी दत्तात्रय अवताडे हे देशमुखवाडी येथील शिवम किराणा दुकानासमोर उभे होते. त्यांची पत्नी घरी होती व मुलगा विठ्ठल व त्याची पत्नी कांचन हे उपचारासाठी बारामती येथे गेले होते. त्यावेळी रणजित काळभोर हा अवताडे यांच्या दुकानासमोर आला व त्याने अवताडे यांना तुझ्या मुलाने यापूर्वी माझ्याविरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार का दिली, असे म्हणून भांडणे करू लागला.
त्यावेळी अवताडे यांनी त्यास शिवीगाळ करू नको असे सांगत असताना काळभोर याने त्याच्या हातातील लहान चाकूने अवताडे यांच्यावर वार करून त्यांना जखमी केले. यावेळी अवताडे यांची पत्नी भांडणे सोडविण्यास आल्यानंतर त्यांनाही काळभोर याने मारहाण करीत बाजूला केले. म्हणून नातेपुते पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक पाटील पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, नातेपुते पोलिसांनी गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जोरदार मोहीम सुरु केली आहे. राीचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. याबाबत नातेपुते व परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.