पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचा ताबा लाभार्थ्यांनी पैसे न भरल्यामुळे मिळण्यास विलंब होत आहे. ठेकेदाराचे 22 कोटी रुपये देणे थकले असल्याने काम बंद आहे. मात्र, ज्या लाभार्थ्यांनी पूर्ण रक्कम भरलेली आहे. अशा लाभार्थ्यांनी एका बिल्डिंगचे काम पूर्ण करून त्यांना ताबा देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले.
प्रधान मंत्री आवास योजनेत 2 हजार 92 घरांचा प्रकल्प बांधण्यात येत आहे. यापैक ी पहिल्या फेजमध्ये 892 घरांचे लाभार्थी निवडण्यात आलेले आहेत. मात्र त्याना अद्याप घरांचा ताबा मिळालेला नाही. लाभार्थ्यांनी पुर्ण रक्कम भरलेली नसल्याने ठेकेदाराने काम थांबवलेले आहे. केवळ 22 लाभार्थ्यांनी पुर्ण रक्कम भरलेली आहे. तर काही लाभार्थ्यांनी 50 हजार, लाख, दीड लाख अशी रक्कम भरल्याने केवळ 2 कोटी 67 लाख रुपये जमा झालेले आहेत. लाभार्थ्यांकडून 22 कोटी रुपये येणे बाकी आहे. लाभार्थ्यांनी पैसे भरले तरच काम पुर्ण होणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ही पंढरपूरकरांसाठी महत्त्वपूर्ण योजना आहे. दर्जेदार बांधकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळेच नागरिकांनी प्रत्यक्ष पाहणी करून पसंती दर्शवली आहे. पहिल्या फेजमधील 892 घरांचे लाभार्थी निवडण्यात आलेले आहेत. या लाभार्थ्यांनी सुरुवातीला काही पैसे भरुन बुकिंगही केले आहे. मात्र त्यांनतर कोरोनाचा काळ आल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला आहे. यातच काम थांबल्याने बँकांनी कर्ज प्रकरणे थांबवली आहेत. त्यामुळे लाभार्थी पूर्ण रक्कम भरू शकले नाहीत. केवळ 22 लाभार्थ्यांनी पुर्ण रक्कम भरली आहे. लाभार्थ्यांनी पूर्ण रक्कम भरली तर थांबलेल्या कामाला गती येईल. त्यामुळे लवकरात लवकर घरांचा ताबा लाभार्थ्यांना देणे सोपे होणार आहे.
लाभार्थ्याला 8 लाख 50 हजाराला घरकूल भेटत आहे. यात केंद्र सरकारचे 1 लाख 50 हजार तर राज्य सरकारचे 1 लाख असे अडीच लाखाचे अनुदान मिळत असल्याने लाभार्थ्याला केवळ 6 लाख रुपये भरावे लागत आहेत. केंद्र सरकारचे पैसे आले आहेत. तर राज्य सरकारचे पैसे मिळावेत म्हणून मागणी करण्यात आलेली आहे. नगरपरिषदेने जागेची किंमत न करता मोफत जागा योजनेकरीता दिलेली आहे. तर जागेची किंमत करुन जागा दिली असती तर घरकुलांची किंमत आणखी वाढली असते, असेही मुख्याधिकारी माळी यांनी सांगीतले.
ताबा द्या; अन्यथा आंदोलन
घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना घरांचा ताबा द्यावा. त्यांनी बँकेची कर्जे, खासगी कर्जे काढून हप्त भरत आहेत. लाभार्थ्यांनी पूर्ण रक्कम भरलेली असतानाही ताबा मिळत नसेल तर लाभार्थ्यांनाबरोबर घेऊन आंदोलन करीत इमारतीवर ताबा मिळवून देऊ, असा इशारा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
लाभार्थ्यांनी पैसे भरले तर कामाला गती येणार आहे. ठेकेदाराचे 22 कोटी रुपये देणेबाकी आहे. पैसे न भरल्याने काम थांबले आहे. म्हाडाबाबत बैठक होऊन याबाबत निर्णय होईल. मात्र, तोपर्यंत ज्या लाभार्थ्यांनी पूर्ण रक्कम भरलेली आहे. त्यांना एका इमारतीचे काम पूर्ण करून लवकरच ताबा देण्यात येईल.
अरविंद माळी, मुख्याधिकारी