सोलापूर

पंढरपूर : भाळवणीत विविध पालखी सोहळ्यांचे उत्साहात स्वागत

दिनेश चोरगे

भाळवणी; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आषाढी वारीच्या निमित्ताने पायी निघालेले पालखी सोहळे पंढरीनगरीच्या जवळ येऊन विसावत आहेत. भाळवणी (ता. पंढरपूर) येथे गोरक्षनाथ महाराज व गोंदवलेकर महाराज पालखी सोहळ्यांचे ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.

पालखी सोहळ्यातील वैष्णव पाऊस – वारा अंगावर झेलत विठुरायाची नगरी हळूहळू पायी चालत जवळ करीत आहेत. सातारा-पंढरपूर मार्गावरुन पायी चालत निघालेल्या सर्व पालख्या तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या भाळवणी येथील शाकंभरी मंदिरात मुक्कामी असतात. भगवी पताका खांद्यावर, डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन चालणार्‍या महिला आणि मुखी 'विठ्ठल विठ्ठल'च्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिसागरात डुंबला होता. ठिकठिकाणी पालखी सोहळ्यासमोर होणार्‍या कीर्तन-भजनात येथील भाविक मंत्रमुग्ध होऊन 'विठ्ठल-विठ्ठल' गजरात दंग झालेले दिसून आले.

गावातील वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांकडूनही आपापल्या घरी मुक्कामी असणार्‍या पालखी सोहळ्याचे अंगणात रांगोळी घालून पालखीचे पूजन करुन स्वागत केले जात होते. वैष्णवांची जेवणाची सोय ग्रामस्थांच्यावतीने केली जात होती. त्याचबरोबर ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी वैष्णवांनी सायंकाळी विसावा घेतला. सायंकाळच्यावेळी पालखी सोहळ्यासमोर भजन-कीर्तनाने चांगलाच रंग भरला होता.

SCROLL FOR NEXT