सोलापूर

पंढरपूर : दर्शन रांगेत 10 शेडची उभारणी

दिनेश चोरगे

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा येत्या 10 जुलै रोजी साजरा होत आहे. या सोहळ्याला 16 ते 20 लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज असल्यामुळे मंदिर समितीकडून भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे म्हणून दर्शन रांग उभारण्याचे काम सुरू आहे. दर्शन रांगेत पत्राशेड येथे कायमस्वरुपी 4 व तात्पुरते 6 असे 10 दर्शन शेड उभारले जात आहेत. दर्शन रांग उभारण्यात येत असल्याने खर्‍या आषाढी यात्रेचा माहोल सुरू झाला असल्याचे दिसून येते.

कोरोनानंतर सुमारे दोन वर्षांनंतर आषाढी यात्रा निर्बंधमुक्त साजरी होत आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. यात मंदिर समितीनेदेखील सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिर समितीचे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरू केली आहे.

श्री विठ्ठल- रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन भाविकांना घेता यावे, म्हणून भाविकांसाठी दर्शन रांग उभारण्यात येत आहे. ऊन, वारा, पाऊस यांपासून दर्शन रांगेतील भाविकांचे संरक्षण व्हावे म्हणून वॉटरप्रूफ दर्शन रांग उभारण्यात येत आहे. स्कायवॉक, सारडा भवन ते पुढे पत्राशेड यापर्यंत दर्शन रांग तयार झाली आहे. पत्राशेडमधीलही दहा दर्शन शेडची उभारणी करण्यात आलेली आहे. या शेडमध्ये दर्शन रांग तयार करण्याचे काम अद्याप सुरु आहे. दर्शन रांग पत्राशेड येथून पुढे गोपाळपूर येथील 'स्वेरी' कॉलेजपर्यंत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे दर्शन रांग 6 ते 7 कि.मी.पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या दर्शन रांगेत भाविकांना पिण्याचे शुध्द पाणी, वीज, लाऊडस्पिकरवरुन श्रींचे गाणी ऐकता येणार आहेत. प्रथमोपचार केंद्र, शौचालये, सीसीटीव्ही याचबरोबर पोलिस बंदोबस्तही असणार आहे. यामुळे दर्शन रांगेत होणारी घुसखोरी रोखता येणार आहे. पाऊस आलाच तर भाविकांना चिखल व पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून दर्शन रांगेत कचखडी टाकण्यात येणार आहे तसेच आवश्यक त्या ठिकाणी मॅट अंथरण्यात येणार असल्याचेही मंदिर समितीकडून सांगण्यात आले.

वॉटरप्रूफ दर्शन रांग
कोरोनामुळे न भरलेली वारी यंदा दोन वर्षानंतर निर्बंधमुक्‍त भरली जात आहे. यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहेत. या भाविकांना भर पावसातही दर्शन रांगेत उभारता यावे, म्हणून दर्शन रांग वॉटरप्रूफ बनवण्यात आली आहे. यामुळे भाविकांचे ऊन, वारा व पाऊस यांपासून बचाव होणार आहे. या रांगेत प्रथमोपचार केंद्र, भाविकांसाठी थंड पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तसेच पत्राशेड दर्शन रांगेत एल.सी.डी.द्वारे श्री विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन अशा सुविधा आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT