सोलापूर

नैसर्गिक रंगांची उधळण करणारा पळस बहरतोय

दिनेश चोरगे

बार्शी; गणेश गोडसे :  ऋतुचक्रानुसार विविध वृक्ष व पानाफुलांची जडणघडण होत असते. त्यातील प्रकर्षाने निरीक्षणात येणारा निसर्गाचा अद्भुत आविष्कार म्हणजे रखरखत्या उन्हाच्या उदासीनतेत चैतन्यमय नैसर्गिक रंगाची उधळण करणारा पळस बहरल्याचे चित्र बार्शी तालुक्यातील पांगरी परिसरात पाहायला मिळत आहे. केशरी फुलांनी पळसाची झाडे बहरल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

पळस बहुगुणी वनस्पती असून तिचे आयुर्मान जास्त आहे. आकार आणि रंग नसला तरीही पळस फुलल्यानंतर सर्वांनाच मोहीत करतो. पळसाची पाने, फुले, बिया यात औषधी गुणधर्म असल्याने त्याचा औषधी म्हणूनही वापर केला जातो. पळसाच्या पानांचा सर्वोपयोगी उपयोग म्हणजे पळसाच्या पानापासून पत्राळी-द्रोण तयार केले जातात. सध्या कृत्रिम पत्राळी-द्रोण तयार होत असल्याने या नैसर्गिक पत्राळी-द्रोण नामशेष होत आहेत.

पळसाची फुले ही नैसर्गिक रंग तयार करण्यासाठीचा रंगस्रोत आहेत. पूर्वी होळी, रंगपंचमी, सण ऊत्सव आदीमध्ये पळसाच्या फुलांचाच उपयोग केला जात असे. त्यामुळे रंगपंचमीच्या पूर्वी बरेच दिवस ही फुले गोळा करणे, रंग तयार करणे अशी लगबग सुरू असायची व रंगपंचमीच्या सणाची रंगत वाढायची. सध्या तयार रंग विविध प्रकारात ऊपलब्ध होत असल्याने ही नैसर्गिक पद्धत कालबाह्य झाली आहे.

पळसाची झाडे 15 दिवस अगोदर फुलांनी बहरलेली आहेत. साधारणतः पळसास होळी पौर्णिमेच्या 8-10 दिवस अगोदर फुले येतात. ज्या वर्षी पळस चांगला बहरतो त्या वर्षी 3 जूनला चांगला पाऊस येऊन जोरदार पावसाळ्याची सुरुवात झाल्याची उदाहरणे आहेत. तसेच पावसाळा चांगला गेला होता. यावर्षी सुद्धा असेच निसर्गाने याद्वारे दिलेले शुभसंकेत ठरावे, असेच आहे.

SCROLL FOR NEXT