सोलापूर : पुढारी वृत्तसेवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था 2022 ची प्रवेश प्रक्रिया 17 जूनपासून ऑनलाईन स्वरुपात सुरू झाली असून यासाठी महाराष्ट्रातील सर्वच शासकीय व खासगी आयटीआयसाठी 1 लाख 49 हजार 268 जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अवघ्या पाच दिवसांमध्ये 1 लाख ऑनलाईन अर्जांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 972 पैकी 417 शासकीय व 450 खासगी आयटीआय आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात एकूण 13 शासकीय, तर 25 खासगी (आयटीआय) औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे आहेत. या माध्यमातून शासकीय संस्थांसाठी 2700, तर खासगी संस्थांसाठी 2400 विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण उमेदवारांना व्यवसायात प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे.
आयटीआयमध्ये पारंपरिक शाखेच्या अभ्यासक्रमांसोबतच नावीन्यपूर्ण रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये विविध अभ्यासक्रम कोर्सपैकी डिझेल मेकॅनिक, मेकॅनिक मोटर व्हेईकल, वीजतंत्री, तारतंत्री, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट या कोर्सेससाठी अधिक अर्ज आल्याचे समजते. कोरोनाच्या महामारीतून सावरल्यानंतर पालकांसह विद्यार्थ्यांचा कौशल्याधारित अभ्यासक्रमापेक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे कल वाढत असल्याचे दिसून येते. आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी लवकर उपलब्ध होतात. अकरावी व इंजिनिअरिंगला प्रवेश न घेणारे विद्यार्थी ठरवून आयटीआयला प्रवेश घेतात. यातून रोजगाराची संधी उपलब्ध होते.
राज्यातील एकूण आयटीआय व विद्यार्थी संख्या
शासकीय आयटीआय 419 जागा व 93 हजार 904 विद्यार्थी
खासगी आयटीआय 553 जागा व 55 हजार 364 विद्यार्थी
एकूण आयटीआय 972 जागा व 1,49,268 विद्यार्थी
ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षांमुळे प्रवेशावर परिणाम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षार्ंपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईनच घेण्यात आल्या. यंदा मात्र परीक्षा ऑफलाईन घेतल्यामुळे मेरिटमध्ये मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षांच्या गुणांचा विचार करता विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर नक्कीच याचा परिणाम होणार आहे.
पाच दिवसांत एक लाख ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. याचा सरळ अर्थ पालकांचा, विद्यार्थ्यांचा व्यावसायिक शिक्षणाकडे कल वाढत आहे. जवळपास सहा लाखांच्या आसपास अर्ज येण्याची शक्यता आहे.
– मनोज बिडकर
प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर