सोलापूर

तुळजापूर : उमरगा, तडवळा सर्व्हिस रोड होणार लवकरच पूर्ण

दिनेश चोरगे

तुळजापूर;  पुढारी वृत्तसेवा :  तुळजापूर शहर व परिसरात राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सर्व्हिसरोड न केल्याने अनेकांचे प्राण गेले आहेत, तर अनेकजण जखमी झाले आहेत. याबाबत दै. 'पुढारी'मधून सडेतोड वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी खडबडून जागे झाले. याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे नांदेड विभागीय संचालक सुनील पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तडवळा गावाचा रस्ता आणि उमरगा रोडवरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण होतील, अशी माहिती दिली.

तुळजापूर परिसरामध्ये सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. याप्रकरणी दै. 'पुढारी'मधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तुळजापूर-लातूर रोड आणि उमरगा रोड येथे झालेल्या चारपदरी महामार्गावरील अपूर्ण राहिलेल्या कामामुळे सतत अपघात होत आहेत. यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. याप्रकरणी तुळजापूर येथील समाजसेवक पंकज शहाणे, काँग्रेसचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष राजेंद्र शेंडगे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे नांदेड विभागीय संचालक सुनील पाटील यांनी उमरगा रोडवरील आवश्यक कामाची मंजुरी मिळाली आहे आणि तडवळा या गावाच्या असणार्‍या मागणीसंदर्भात टेंडर काम झाले आहे, अशी माहिती दिली आहे.

लातूर रोडवरील चार रस्त्यांमध्ये होणारे अपघात लक्षात घेऊन येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी स्थानिक लोकांनी केली होती. ही मागणीदेखील लवकरच पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती संचालक सुनील पाटील यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिली. काक्रंबा या गावाची अडचण लक्षात घेऊन तांत्रिक अडचणी सोडवून लवकरच काक्रंबा येथील रस्त्याचा प्रश्‍न सोडवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुढील काही महिन्यांमध्ये उड्डाणपूल आणि काक्रंबा येथील रस्त्याचा प्रश्‍न सोडवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. तुळजापूर ते औसा हा चारपदरी सिमेंटचा रस्ता दिलीप बिल्डकॉन या कंपनीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग नांदेड विभाग आणि दिलीप बिल्डकॉन यांच्याकडून काम करीत असताना अनेक ठिकाणी अपूर्ण रस्ते झालेले आहेत. विशेषत: सर्व्हिस रोड अपूर्ण राहिलेले आहेत. सर्व्हिस रोडची कमतरता असल्यामुळे जड वाहनांना शहरामधून प्रवास करावा लागतो आहे.

या अडचणीमुळे मोठ्या प्रमाणात अपघाताची संख्या वाढली आहे. ही बाब स्थानिक नागरिकांना अत्यंत जीवघेणी ठरली आहे. वेगवेगळ्या अनेक अपघातांमध्ये लोकांचे जीव गेले आहेत. याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक यांच्याकडून वेळोवेळी उठाव करण्यात आलेला आहे. दरम्यान, नांदेड विभागीय संचालक सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उमरगा रोडवरील अपूर्ण कामे आणि तडवळा गावाच्या प्रश्‍नांची सोडवणूक झालेली आहे, असे सांगितले तसेच इतर सर्व कामे लवकरच पूर्ण केली जातील, असे आश्‍वासन दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT