सोलापूर

तुमच्या पापाचा घडा भरला; खासदार धनंजय महाडिक यांचा अनगरकरांना इशारा

मोहन कारंडे

टाकळी सिकंदर; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांच्या मालकीचा भीमा कारखान्यावर आर्थिक भुर्दंड नको, म्हणून ही निवडणूक मी बिनविरोध करण्याचे आवाहन केले. मी जी आश्वसने दिली होती ती पूर्ण केली आहे, त्यामुळे चिंताच नाही, मात्र काही जणांना निवडणुकीची खूमखमी असल्याने निवडणूक लागली. तुमच्या पापाचा घडाच भरला आहे, असा निर्वाणीचा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी अनगरकरांना दिला. भीमा कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने भीमा शेतकरी विकास आघाडीच्या
प्रचाराचा प्रारंभ वडवळ येथील नागनाथाच्या चरणी श्रीफळ अर्पण करून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर सोलापूर जि.प. अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील, भाजपा नेते संतोष पाटील, व्हाईस चेअरमन सतीश जगताप, विश्वराज महाडिक, विनोद महाडिक, पवन महाडिक, विजय महाडिक, मानाजी माने, चरणराज चवरे, रमेश बारसकर, प्रभाकर देशमुख, विक्रांत माने, शैला गोडसे, छगन पवार, राहुल गुंड, सर्जेराव चवरे, रामराव भोसले, पंडित निकम, शिवाजी गुंड, तानाजी गुंड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

विजयराज डोंगरे म्हणाले, खा. महाडिक यांनी गेल्या दहा वर्षांत दिलेली आश्वासनाची पूर्तता केली आहे. कारखानास्थळी उभा असलेले दोन प्रकल्प हे त्याची साक्ष देत आहे. कारखान्यावर झालेले कर्ज हे निसर्गाच्या प्रकोपामुळे झाले आहे. त्यामुळे विरोधकांनी याचा बाव करण्याची अजिबात आवश्यकता नाही. या निवडणुकीत भीमा परिवार जेवढ्या ताकतीने काम करेल त्याच्यापेक्षा जास्त गतीने आणि ताकतीने लोकशक्ती परिवार रिंगणात असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. उमेश पाटील बोलताना म्हणाले की, कारखान्याच्या शेअर्ससाठी लोकांकडून पैसा गोळा केला. शिक्षकांच्या पगारातून पैसे कपात करून, भीमा कारखान्यावरील वस्तू नेऊन लोकनेते सहकारी कारखाना उभा केला. आणि त्यांनी शेतकर्‍यांच्या डोक्यात दगड घालून हाच कारखाना आता स्वतःच्या खासगी केला. शेतकर्‍यांची तुम्हाला एवढीच काळजी होती तर लोकनेते कारखाना पुन्हा सहकारी करून दाखवा मी तुमच्यासोबत प्रचाराला येईन, असे सांगून भीमा बचाव नव्हे तर यांच्यापासून मोहोळ तालुका बचाव ही मोहीम आता उघडन्याची वेळ आली आहे. आता ते भविष्यात भाजपा मध्ये आले तर 'भाजपा बचाव' म्हणून चिंतन करावे लागेल अशी कोपरखळी त्यांनी लगावली. यावेळी उमेदवार बिभीषण वाघ, सुनील चव्हाण, संभाजी कोकाटे, संतोष सावंत, तात्यासाहेब नागटिळक, गणपत पुदे, राजेंद्र टेकळे, सिंधू जाधव, प्रतीक्षा शिंदे, अनिल गवळी, सिद्राम मदने, बाळासाहेब गवळी यांच्यासह मोहोळ,मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील आजी माजी नेते, कार्यकर्ते, सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवडणुकीच्या निमित्ताने वाट्टेल राजन पाटील यांची दोन्ही मुले बोलत फिरत आहेत, अपशब्द वापरणे आमची संस्कृत्ती नाही; परंतु आम्हाला तसे बोलता येते; पण तसे आमच्यावर संस्कार नाहीत असे सांगून नमानीप्रमाणे वागू नका, असा थेट इशारा बाळराजे व अजिंक्यराणा यांना प्रभाकर देशमुख यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT