सोलापूर

तुकाराम महाराज पालखीचे उभे रिंगण; माळीनगरात उत्साह शिगेला

दिनेश चोरगे

माळीनगर : 

टाळ, मृदंगाचा ध्वनी।
गेले आसमंत व्यापुनी।
नभ आले भरूनी।
अश्व दौडले रिंगणी॥

माळीनगर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे रविवारी सकाळी 8.45 च्या सुमारास जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे पहिले उभे रिंगण झाले. माळीनगर पालखी मैदानात अश्वांनी दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्यांची अक्षरशः पारणे फेडली. आसमंत व्यापून टाकणारा चैतन्य स्वरूप टाळ-मृदंगाचा नाद, तसेच 'ग्यानबा-तुकाराम' नामाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे॥

टाळ-मृदंगाचा नाद, कपाळी अष्टिगंध आणि मुखात हरिनामाचा जयघोष… गेली पंधरा दिवस अखंडितपणे विठूरायाच्या ओढीने निघालेला वारकरी हजारो वैष्णवांच्या साक्षीने माळीनगरात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा मानाच्या अश्वाच्या पहिल्या उभ्या रिंगणाने भल्या सकाळी मॉडेल हायस्कूलच्या प्रशस्त प्रांगणात मोठ्या उत्साहाने विसावला.

याची देही याची डोळा
पहावा सोहळा॥

परिसराला जणू विठ्ठलनामाचे वेड लागले होते. 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' गजराने आसमंत दुमदुमला. सकाळपासून पालखी स्वागतासाठी माळीनगर ग्रामपंचायत, सासवड माळी शुगर फॅक्टरी यांच्यासह महात्मा फुले पतसंस्था, शुगरकेन सोसायटी तसेच अनेक सामाजिक संघटना, स्थानिक प्रतिनिधी सज्ज झाले होते.

उभ्या रिंगणासाठी जमलेला हजारोंचा जनसमुदाय डोळ्यांचे पारणे फेडत होता. अखेर मानाच्या अश्वाने रिंगणात धाव घेतल्यानंतर दोहोबाजूला उभा असणारा वारकरी भान हरपून गेला होता. याचसाठी केला होता अट्टाहास म्हणत सोहळा डोळ्यात साठवत होता.
शनिवारपासून पावसाला सुरुवात झाल्याने परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळपासूनच माळीनगर परिसरात सर्वांना पालखी आगमनाची आतुरता होती. माळीनगर येथे सासवड माळी शुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर नंदकुमार गिरमे व त्यांच्या सुविद्य पत्नी रसिका गिरमे यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी होलटाईम डायरेक्टर सतीश गिरमे, संचालक राहुल गिरमे, विजय नवले, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज संस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, सोहळाप्रमुख अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, सोहम महाराज मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी माळीनगर ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, माळी शुगरचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस प्रशासन यांनी चोख व्यवस्था केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT