बेंबळे : पुढारी वृत्तसेवा टेंभुर्णी-बेंबळे रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या कामात ठेकेदार व अधिकार्यांकडून जाणूनबुजून दिरंगाई होत आहे. अत्यंत संथगतीने काम होत आहे. आषाढी एकादशीच्या आत हे काम पूर्ण व्हावे. संबंधित भ्रष्ट अधिकार्यांची चौकशी करून निलंबित करावे, तसेच निकृष्ट काम करणार्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना बेंबळेसह इतर परिसरांतील नागरिकांनी दिले आहे.
टेंभुर्णी-बेंबळे या साडेसहा किलोमीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम मार्च 2021 मध्ये मंजूर झाले होते. मार्च 22 पूर्वी काम पूर्ण करण्याचे निश्चित होते. परंतु मे 22 पर्यंत कामाची सुरुवातही झाली नाही. यानंतर पावसाळा म्हणून व त्यानंतर ऊस वाहतुकीच्या वाहनांची अडचण सांगून एप्रिल 22 पर्यंत कोणतेही काम केले नाही. मागील दोन महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरू केले. खडीचा थर कमी वापरला, बाजूच्या साईडपट्ट्या भरून घेतल्या नाहीत तसेच डांबरामध्ये कुठले तरी काळे तेल भेसळ करुन हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. याशिवाय हे काम एक महिन्यापासून बंदच आहे. अनेक वेळा संबंधित अधिकारी व ठेकेदाराकडे नागरिकांनी चौकशी केली, परंतु टोलवाटोलवीच्या उत्तराशिवाय हाती काही लागले नाही.
दहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. जळगाव, धुळे, अहमदनगर, बुलढाणा, वाशिम, नाशिक या भागांतून गावोगावच्या लहान पालख्या, दिंड्या व त्याबरोबर येणारे हजारो वारकरी टेंभुर्णीपासून पुढे जवळचा मार्ग म्हणून बेंबळे, घोटी, जळोली, करकंबमार्गे पंढरपूरला जातात. त्यांच्यासाठी रस्ता चांगला असणे आवश्यक आहे. परंतु भ्रष्ट अधिकारी, निकृष्ट काम करणारे स्वार्थी ठेकेदार यांच्या संगनमताने येथील कामास विलंब लावला जात आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून जनतेला वेठीस धरण्याचे काम यांच्याकडून होत आहे. बेंबळे हा बागायती परिसर असून लाखो टन ऊस, फळे, भाज्या, दूध याची वाहतूक या रस्त्यावरून सतत होत असते. दररोज मोटारसायकल, जीप, ट्रॅक्टर व इतर अवजड वाहनांची वाहतूक सतत चालू असते. या सर्व बाबींची अधिकार्यांना व ठेकेदाराला कल्पना आहे.
या रस्त्यावरुन घोटी, कान्हापुरी, वाफेगाव, सांगवी, जळोली, बेंबळे, हरिनगर, काळे वस्ती, भोसलेवाडी, मिटकलवाडी, माळेगाव आदी ठिकाणांहून हजारो नागरिकांची सतत ये-जा चालू असते. केवळ खराब रस्त्यामुळे या मार्गावरुन होणार्या एस.टी.च्या खेपा आता बंद पडल्या आहेत. त्यामुळे अवैध वाहतुकीचा जोर वाढला आहे. रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये निधी शासन मंजूर करते. परंतु भ्रष्ट अधिकारी व स्वार्थी ठेकेदार संगनमताने कामच करत नाहीत आणि केलेच तर निकृष्ट प्रतीची कामे करतात. बिल काढून घेण्यात मात्र तत्परता दाखवतात, हे उघड सत्य आहे. कनिष्ठ कार्यालयातील लिपिकापासून ते गुणवत्ता नियंत्रण अधिकार्यांपर्यंत टक्केवारी ठरलेली असते, असे बोलले जाते. जनतेला मात्र निष्कारण वेठीस धरले जात आहे. या प्रकरणाकडे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर हा रस्ता वेळेत आणि चांगल्या प्रतीचा नाही झाला तर याविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही येथील नागरिकांनी दिला आहे.
बेंबळे-घोटी या चार किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे खड्डे बुजवण्याचे काम आषाढी एकादशीअगोदर युद्धपातळीवर व्हावे, अशी नागरिकांतून रास्त मागणी होत आहे.