सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :
सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 221 चारा छावण्याची गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेली जवळपास 36 कोटी 85 लाख रुपयांची बिले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात नुकतीच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याकडे बैठक झाली असून सोलापूर जिल्ह्यातील थकीत असलेल्या छावणी चालकांची बिले अदा करण्याबाबत चर्चा झाली.
दरम्यान, यावेळी या चारा छावण्यांनी ऑफलाईनमध्ये बिल तयार केलेली आहेत.तसेच त्यासाठी स्थानिक तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी साहाय्यकांनी देखरेख केलेली आहे. त्यामुळे या ऑफलाईन बिलाची तपासणी करुन प्रस्ताव द्या अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 36 कोटींची बिलं मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या.यामध्ये सार्वाधिक छावण्या या सांगोला तालुक्यात होत्या, तर मंगळवेढा 61, पंढरपूर 6 आणि मोहोळ तालुक्यात 8, अशा जवळपास 221 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या.
या चारा छावण्यामध्ये दाखल होणार्या जनावरांना जिओ टँगिग करुन त्याचे रोजच्या रोज रेकॉर्ड शासनाला मिळावे, यासाठी शासनाच्या वतीने शौर्य हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले होते. चारा छावणीत दाखल असलेले जनावरे आणि त्यांना दररोज मिळणारा चारा याची माहिती यावर अपलोड करण्यात येत होती. तसेच स्थानिक पातळीवर तलाटी, ग्रामसेवक आणि कृषि सहाय्यक यांची समिती नेमण्यात आली हेाती.त्यांनी ही याचे रेकॉर्ड ठेवण्याच्या सूचना शासनाच्या वतीने करण्यात आल्या होत्या. मात्र, ज्या लोकांनी ऑनलाईन रेकॉर्ड तयार केले होते.
त्या- त्या छावणी चालकांना त्या त्या वेळी होणारी बिले अदा करण्यात आली आहेत. मात्र, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक छावणी चालकांनी हे ऑनलाईन रेकॉर्ड ठेवले नव्हते त्यामुळे ही बिले द्यायची की नाही याविषयी शंका उपस्थित झाली होती. तसेच चारा छावण्या आणि तक्रारी यामुळे प्रशासनाने या विषयाकडे काहीअंशी दुर्लक्ष केले होते. मात्र, आपत्ती काळात तसेच दुष्काळजन्य परिस्थितीत पदरमोड करून जनावरे जगविली आहेत. त्यामुळे आमची बिले मिळावीत, अशी मागणी चारा छावणी चालकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.तसेच जर वेळेत बिले मिळाली नाहीत तर काही मंडळींनी आत्मदहन करण्याचा इशारा ही दिला होता.
तसेच याविषयीच्या तक्रारी थेट लोकप्रतिनिधी मार्फत आपत्ती आणि मदत व पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या पर्यंत पोहोचल्या होत्या. यावर मंत्री वड्डेटीवार यांनी नुकतीच एक बैठक घेऊन या विषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी ऑफलाईन बिले तयार करताना त्या ठिकाणी ही तलाटी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक होतेच.त्यामुळे जर कोठे शंका असेल तर त्याची पुन्हा तपासणी करा आणि चारा छावणी चालकांची बिले द्या, अशा सूचना अधिकार्यांना केल्याची माहिती मिळाली आहे.
ऑफलाईन मध्ये आलेल्या बिलांची अॅडीटर मार्फत तपासणी करुन ती बिल शासनाला पाठविण्यात येणार आहेत.
– वर्षा लांडगे
जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर