सोलापूर

सोलापूर : गणपतीचे विसर्जन करत असताना एक युवक वाहून गेला

Arun Patil

मोहोळ; पुढारी वृत्तसेवा : दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करत असताना एक युवक सीना नदी पात्रात वाहून गेल्याची घटना शनिवार, दि. 11 रोजी मोहोळ तालुक्यातील आष्टे गावाच्या शिवारात घडली. सौरभ सुभाष बेंबगळे (वय 18, रा. लातूर) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.

सौरभ सुभाष बेंबगळे हा युवक मोहोळ येथील विषाल निर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. या कंपनीतील कर्मचार्‍यांनी गुरुवारी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. शनिवार, दि. 11 रोजी दुपारी या दीड दिवसाच्या

गणपतीचे विसर्जन करण्यासाठी कंपनीतील कामगार आष्टे गावच्या शिवारातील सीना नदी पात्रात गेले होते. दुपारी सव्वातीन वाजण्याच्या दरम्यान गणपती विसर्जन करत असताना अचानक पाय घसरल्याने सौरभ बेंबगळे तो पाण्यात प्रवाहासोबत वाहून जाऊ लागला. त्याने पोहून बाहेर येण्याचा प्रयत्न केला.

मात्र पाण्यातील बोहर्‍यामध्ये अडकल्याने काही क्षणातच तो पाण्यात बुडून दिसेनासा झाला. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार युसुफ शेख यांनी पोलिस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यात सर्वत्र सौरभ चा शोध घेतला. मात्र तो कुठेच मिळून आला नाही.

सीना नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याकारणाने पाण्यात बुडून सौरभचा मृत्यू होऊन तो वाहत गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलिसात या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आलेली नव्हती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT