सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पांढरा वेश, हातात भगवी पताका, मुखात हरिनाम, एका रांगेत चालणार्या शिस्तीचा सोहळा पंढरीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कुचन प्रशालेतील मुक्काम उरकून सात रस्त्यावरील उपलप मंगल कार्यालयात दाखल झाला.
पूर्व भागातील कुचन प्रशालेतून शुक्रवारी (दि. 23) सकाळी सहा वाजता पालखी सोहळा सात रस्त्यावरील उपलप मंगल कार्यालयाच्या दिशेने निघाला. मोठ्या शिस्तीने चालणारे दोन चोपदार, बँड पथक, त्यांच्या मागोमाग एका रांगेत चालणारे वारकरी, त्याच्या मागे टाळ-मृदंगाचा गजर करत आणि भजन, भारुड, अभंग गाणारे गायक, पालखी, असा क्रम गजानन महाराज पालखीत होता. कुचन प्रशालेतून या पालखीचे जोडबसवण्णा चौक, पद्मशाली चौक, सिव्हिल हॉस्पिटल, बेडर पूल, नळ बझार, जगदंबा चौक, लष्कर, सात रस्तामार्गे उपलप मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता आगमन झाले.
पालखीमार्गावर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उपलप मंगल कार्यालयात रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. उपलप मंगल कार्यालयातील मुक्काम आटोपून शनिवारी (दि. 24) सकाळी सहा वाजता पालखी मिरवणुकीने पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी मोदी पोलिस चौकी, रेल्वे डीआरएम ऑफीस, जुना एप्म्लॉयमेंट चौक, डफरीन चौक, पार्क चौक, रामलाल चौक, भैय्या चौकमार्गे दमाणीनगर येथे सकाळी 11 वाजता पोहोचणार आहे. येथे दुपारचे भोजन उरकून पालखी तिर्हेमार्गे पंढरपूरसाठी मार्गस्थ होणार आहे. मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.
शेगावहून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यात यंदा 800 वारकरी आहेत. हा पालखी सोहळा सोलापुरात दाखल झाल्यानंतर श्री संत सेना नाभिक मंडळातर्फे त्यांची दाढी आणि कटिंग मोफत करण्यात आली. वारकर्यांचा थकवा घालविण्यासाठी मसाजही करण्यात आला. दाढी, कटिंग करणार्यांसाठी अल्पोपहार बनविण्यासाठी सुलोचना भाकरे यांनी साहित्य दिले.
राष्ट्रसंत गाडगे महाराज परिट समाजाच्या वतीने गजानन महाराज पालखीत असलेल्या वारकर्यांचे कपडे मोफत धुवून इस्त्री करून देण्यात आली. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही परिट समाजबांधवांनी यंदाही कायम ठेवली. यामुळे वारकर्यांना कपडे धुण्यापासून सुटका मिळाली.
गजानन महाराज पालखीतील वारकर्यांच्या फाटलेल्या चप्पल, बूट शिवून त्याला पॉलिशही करण्यात आले. काही वारकर्यांच्या फाटलेल्या बॅगाही मोफत शिवून देण्यात आल्या. गेल्या अनेक वर्षांपासून ही सेवा केली जात आहे.
डॉ. हेगडेवार रक्तपेढीच्या वतीने गत आठ वर्षांपासून रक्तदान शिबिर घेण्यात येते. यंदाही शिबिर घेण्यात आले. याला चांगला प्रतिसाद मिळाला. भक्तांबरोबरच वारकर्यांनीही रक्तदान करून प्रोत्साहन दिले. याने रक्तदान चळवळीला बळ मिळेल.