कुर्डूवाडी : पुढारी वृत्तसेवा : कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भातील हरकती व सूचनेनंतर प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा जाहीर झाला आहे. पूर्वीची वॉर्ड रचना राजकीय हेतूने प्रेरित होती, असा आरोप विरोधकांकडून होता. त्यास अनेकांनी हरकती घेतल्यानंतर काही प्रभागांमध्ये अंशत: बदल करून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. तसेच, नवे इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
प्रभाग रचनेत नेते मंडळींनी कुर्डूवाडी शहरातील राजकीय परंपरा असलेले गवळी, बागल व गोरे या तिघांना एकाच प्रभागात टाकले होते. तिघे दिग्गज एकाच प्रभागात असल्याने निवडणूक चुरशीची, रंगतदार आणि प्रतिष्ठेची झाली असती. मात्र, अनेकांनी घेतलेल्या हरकतींमुळे आता बाबासाहेब गवळी यांचा वॉर्ड वेगळा, बागल परिवाराचा वॉर्ड वेगळा व गोरे परिवाराचा वॉर्ड वेगवेवेळा झाला आहे.
नव्या प्रभाग रचनेमुळे कुर्डूवाडी शहराचे दोन भाग झालेले आहेत. रुळाच्या पलीकडे रेल्वे कॉलनी येथे आता एकूण सात नगरसेवक निवडून येणार आहेत. यापैकी चार नगरसेवक राखीव ठेवण्यात आले. गेल्या वेळेस ही संख्या तीन होती आता एका नगरसेवकाची यात वाढ झाली आहे. मार्केट यार्डचा काही भाग रेल्वे कॉलनीच्या भागाला जोडलेला आहे. शिवाजी चौक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी तीन प्रभागांमधील सहा नगरसेवकांत आपल्या मतांचा दबाव गट राहावा म्हणून शिवाजी चौकाची विभागणी तीन प्रभागांत केली आहे. मात्र, हा भाग फोडल्यामुळे याचा फायदा होतो की तोटा होतो, हे येणारा काळच ठरवू शकतो. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुकांसह सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. आगामी निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होणार असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.
कुर्डूवाडी नगरपरिषद प्रभाग रचना पुढीलप्रमाणे – प्रभाग क्र. 1- मतदार 2293, अ.जा 973, अ.ज. 21. बुद्धविहार, करमाळा रोड, ओम हॉस्पिटल, पारधी वस्ती, रेल्वे स्लिपर गोडावून, देवकते वस्ती, जाधव मळा, सेंट मेरी चर्चच्या पाठीमागील भाग, रेल्वे शाळेच्या पाठीमागील भाग. प्रभाग क्र. 2- मतदार 2176, अ.जा. 741, अ.ज.45. मध्ये रेल्वे ग्रंथालय, आर.बी. 2 लाईन कुर्डूवाडी, नालसाहबनगर, बार्शी नाका, राम मंदिर परिसर, पाच कोठडी, राऊत वस्ती, भूत बंगला, रेल्वे बिल्डिंग.प्रभाग क्र. 3 – मतदार 2416, अ.जा. 2416, अ.ज. 41, रेल्वे कॉलनी, रेल्वे कारखाना, अवताडे वस्ती, टोणपे मळा, चौधरी वस्ती, गवळी वस्ती, भैय्याचे रान, शुभमनगर. प्रभाग क्र. 4- मतदार 2179, अ.जा. 535, अ.ज. 20. अवताडे वस्ती, सिद्धेश्वरनगर, जिजामातानगर, देवकते, लेंगरे-पारखे वस्ती, जंजिरे, मदने, पोळखे वस्ती, मार्केट यार्ड, हमाल चाळ. प्रभाग क्र. 5 – मतदार 2085, अ.जा. 472, अ.ज. 29. शिक्षक सोसायटी, काडादी चाळ, नेहरूनगर, पोलिस स्टेशनजवळ, खाटिक गल्ली, शिवाजी चौक, करंदीकर दवाखान्याजवळ, तलाठी ऑफिस, मिठाई गल्ली.प्रभाग क्र. 6- मतदार 2341, अ.जा. 233, अ.ज. 19.भूषण लॉजलाईन, आंतरभारतीजवळ, कुंतल शहानगर, दाळवाले गल्ली, साई कॉलनी.
प्रभाग क्र. 7 – मतदार 2243, अ.जा. 633, अ.ज. 43. पंजाब तालीम, दत्त मंदिरजवळ, एस.टी. स्टँड, म्हसोबा गल्ली, बागल मळा, साठेनगर, सिद्धार्थनगर. प्रभाग क्र. 8 – मतदार 2217, अ.जा. 180, अ.ज. 7. शनी मंदिर, विठ्ठल मंदिर, मोहोळकर चाळ, गांधी चौक, शिवाजी चौक, बसवेश्वर चौक, पटेल चौक. प्रभाग क्र. 9 – मतदार 2467, अ.जा. 400, अ.ज. 34. ब्राह्मण चाळ, गीताबाईचा मळा, यशवंतनगर, गॅस गोडवून, पाणी टाकीजवळ. प्रभाग क्र.10- मतदार 2046, अ.जा. 396, अ.ज. 33. पर्वतसंकुल माढा रोड, बाळकृष्णनगर, फिल्टर पंप, नूतन शाळा, दशरथ भांबुरेनगर, सरकारी दवाखान्याजवळ, अशी लोकसंख्या व प्रभाग तयार केले आहेत.
प्रभाग रचनेत झाला मोठा बदल
या आधी केलेली प्रभाग रचना ही काही जणच मिळून केली होती. ती सत्ताधार्यांना फायदेशीर होती. त्यामुळे अनेकांनी त्यावर आक्षेप घेतले. प्रशासकीय अधिकार्यांनी स्वतः गोत्यात येऊ नये म्हणून नव्याने योग्य सर्वसमावेशक अशी प्रभाग रचना केलेली आहे. शेवटी मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, यावरूनसुद्धा बरीच राजकीय गणिते ठरणार आहेत.
प्रभागांच्या मोडतोडीने 'कहीं खुशी, कहीं गम'
यापूर्वीच्या 17 प्रभागांत 17 नगरसेवक होते. आता नव्या नियमाप्रमाणे 10 करण्यात आले असून, प्रत्येक प्रभागात 2 असे एकूण 20 नगरसेवक असणार आहेत. जुन्या प्रभागांची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांसह काही राजकीय पक्षांना फायदा, तर काहींना त्याचा राजकीय तोटादेखील सहन करावा लागणार आहे. त्यामुळे 'कहीं खुशी, कही गम' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.