सोलापूर

अक्कलकोट : करमणूक कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दिनेश चोरगे

अक्कलकोट; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक रसिकांना आपल्या खास शैलीत कर्नाटकचे प्रसिद्ध हास्यसम्राट गंगावती प्राणेश यांनी 'हास्य संजे' या कार्यक्रमातून खळखळून हसविले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा 35 वा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. सोमवारी सायंकाळी 7 वाजता 'हास्य संजे' कन्नड विनोदी कार्यक्रम सादरकर्ते गंगावती प्राणेश आणि सहकारी कर्नाटक यांच्या कार्यक्रमाचे दुसरे पुष्प झाले.

या कार्यक्रमास अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी या शहर व तालुक्यासह कर्नाटक सीमाभागातील आळंद, अफझलपूर, इंडी, जत, दक्षिण सोलापूर व शहरातील हजारोंच्या संख्येने श्रोतेेगण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन विरक्‍त मठाचे प.पू. बसवलिंग महास्वामी, माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, डॉ. शरणबसप्पा दामा सोलापूर, बँक ऑफ महाराष्ट्रचे सहायक सरव्यवस्थापक व विभागीय व्यवस्थापक दत्तात्रेय कावेरी, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्‍वस्त अमोलराजे भोसले, महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, श्रींची प्रतिमा व स्व. लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्‍वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते यथासांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील, शिवराज स्वामी, प्रगतशील शेतकरी सुरेश उमराणीकर यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यासह हास्य कलाकार गंगावती प्राणेश, बसवराज महामनी व अजय संकेश्‍वर, कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र घटकाचे अध्यक्ष व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे जनसंपर्क अधिकारी सोमशेखर जमशेट्टी हे निवडून आल्याबद्दल व कन्नड भाषा प्रसाराच्या कार्याची नोंद घेऊन न्यासाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी न्यासाचे विश्‍वस्त अलका भोसले, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा महानंदा स्वामी, मल्लम्मा पसारे, उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्‍वस्त संतोष भोसले, प्रा. शरणप्पा आचलेर, राजशेखर उमराणीकर, शरणप्पा फुलारी, विद्याधर गुरव, ओंकारेश्‍वर उटगे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्‍वेता हुल्ले यांनी केले. न्यासाचे सचिव श्यामराव मोरे यांनी आभार मानले.

देश-विदेशातही कार्यक्रम
प्राणेशने 1994 पासून साहित्यातील विनोद अंतर्भूत करण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी कार्यक्रम सुरू केले. उत्तर कर्नाटकात 'हास्य संजे' नावाचा अभिनव विनोदी कार्यक्रम सुरू करण्याचे श्रेय गंगावती प्राणेश यांना जाते. गुलबर्गा आकाशवाणीपासून सुरू झालेला त्यांचा विनोदी संध्याकाळचा कार्यक्रम आता विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर पसरला आहे. जगातील विविध भागांतील सुमारे 400 शहरांमध्ये प्राणेशने 3 हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम केले आहे. मध्यपूर्व देश, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, अमेरिका आदी देशांमध्ये लोकप्रिय आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT