दक्षिण सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : अंत्रोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथे शेतात काम करीत असताना बँकेचे कर्ज फेडण्याच्या विषयावरून झालेल्या वादाचे पर्यावसन खुनात झाले. झालेला खून लपविण्यासाठी अपघाताचा बनाव करण्यात आला होता, मात्र मंद्रूप पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपघाताचा बनाव फसला असून हा अपघात नसून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
या घटनेत शिवाजी थोरात (वय 55, रा. अंत्रोळी) याचा खून झाला होता. शिवाजी थोरात यांचा मोटारसायकलवरून पडून अपघात होऊन मृत झाल्याचा बनाव करण्यात आला होता. याबाबत भीमराव रामचंद्र जाधव (रा. कंदलगाव, ता. दक्षिण सोलापूर ग्रामीण (मृताचा मेव्हणा), तानाजी शिवाजी थोरात (रा. अंत्रोळी), (मृताचा मुलगा) यांच्या विरोधात मंद्रूप पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, अंत्रोळी येथील थोरात यांच्या शेतामध्ये खुरपणीचे काम सुरू असताना मृत शिवाजी थोरात यांने खुरपणीच्या काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन बँकेच्या कर्जाचा विषय काढला तेव्हा, तुमच्या जवळचे सोने देऊन कर्ज फेडा, असे म्हटले असता त्याची पत्नी हिरा हिने मी सोने देणार नाही, असे म्हटल्यावर तिचे पती शिवाजी थोरात याने रागाला जाऊन पत्नीस कुर्हाडीने बरगडीवर मारून जखमी केले होते. याचाच राग धरुन त्याचा मेव्हणा भीमराव रामचंद्र जाधव याने मृत शिवाजी थोरात यास नारळाच्या झाडास बांधून काठीने मारहाण केली होती. आणि त्याच्या बहिणीस उपचारासाठी मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले
होते.
दरम्यान मृताचा मुलगा तानाजी शिवाजी थोरात हा त्याला रस्त्यात भेटल्यानंतर घटनेबाबत माहिती देऊन आपण मारहाण केल्याच्या सांगितले होते. त्यानंतर पुन्हा तानाजी थोरात याने वडील शिवाजी थोरात यांना पुन्हा काठीने मारहाण केली. या मारहाणीनंतर शिवाजी थोरात गतप्राण झाले होते. त्यानंतर त्यास झाडाचे बांधलेले सोडून घरासमोरील बाजेवर झोपविण्यात आले होते. आणि याबाबत शिवाजी थोरात यांचा गाडीवरून अपघात होऊन अपघाती मृत्युची खबर त्यांचा मुलगा तानाजी शिवाजी थोरात यांने मंद्रूप पोलिसात दिली होती. घटनेत पोलिसांना संशय आले असता त्यांनी मृताची पत्नीस विश्वासात घेऊन सहा. पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे व अंमलदार मंद्रुप पोलिस स्टेशन यांनी सखोल चौकशी केली असता शिवाजी थोरात यांचा अपघाती मृत्यू नसून तो खून झाल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे. यानंतर लागलीच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळून आरोपींना अटक केली.