सोलापूर : दिव्यांग शाळांमधील निधी वाटप, विविध प्रशासकीय कामकाजाची चौकशीसाठी लागणारी कागदपत्रे जिल्हा समाजकल्याण विभागाने दिव्यांग विभागाला उपलब्ध करुन दिली आहेत. त्या कागदपत्रांची चौकशी समितीकडून तपासणी करण्यात आली आहे.
तत्कालीन प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सचिन कवले यांच्या काळात दिव्यांग शाळांमधील निधी वाटप, विविध प्रशासकीय कामकाजातील अनियमिततेच्या तक्रारींच्या अनुषंगाने पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त (दिव्यांग कल्याण) कार्यालयाने जिल्हा दिव्यांग समन्वय कार्यालयाकडे तातडीने अभिलेख सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दिव्यांग कल्याण विभागाने कागदपत्रे उपलब्ध करुन दिली. त्याची तपासणी करण्यात आली आहे.
शिक्षक भारती दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक मुठाळ यांनी केलेल्या तक्रारीनंतर पुणे येथील प्रादेशिक उपायुक्त कार्यालयांने तपासणीसाठी काही कागदपत्रे मागितली होती. परंतु ती उपलब्ध नसल्याने चौकशी समिती परत गेली होती. ती समिती पुन्हा सोलापूरमध्ये येऊन कागदपत्रांची तपासणी केली आहे. त्याचा अहवाल पुणे प्रादेशिक कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.
कोणती कागदपत्रे दिली अन् कोणती लपवली
तत्कालीन जिल्हा समाज कल्याण अधिकारी कवले यांच्या कार्यकाळातील काही प्रकरणांबाबत चौकशी समितीकडून तपासणी करण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी कोणती कागदपत्रे दिली अन् कोणती लपवली, याची चर्चा सुरू झाली आहे.