सोलापूर

Solapur News: जिओटॅग फोटोनंतरच बिले द्या; जि.प. बांधकामचा निर्णय

शाळेच्या स्‍लॅबवेळी अभियंत्‍यांची उपस्‍थिती अनिवार्य

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जिल्‍हा परिषदेच्‍या प्राथमिक शाळेचा गिलावा पडण्याचे प्रकार पुढे येत आहेत. त्‍यामुळे आता शाळेचा स्‍लॅब टाकताना शाखा अभियंत्‍यांची उपस्‍थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच त्‍यावेळच्या जिओटॅग छायाचित्रानंतरच बिले देण्याचा निर्णय बांधकाम समितीच्‍या मासिक बैठकीत झाल्‍याची माहिती उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिली.

जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात शुक्रवारी (दि. ११) उपाध्यक्ष पवार यांच्‍या अध्यक्षतेखाली बांधकाम विभागाची बैठक झाली. त्‍यावेळी शाळेचा स्‍लॅब टाकताना अभियंत्‍यांची उपस्‍थिती बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी सदस्‍य सचिन जाधव, अतुल पवार, नेताजी खंडागळे, विकास बुळ्ळा, पूजा ढेरे, बांधकाम एकचे कार्यकारी अभियंता आसिफ खैरादी, बांधकाम दोनचे कार्यकारी अधिकारी अतुल लेंडवे आदी उपस्‍थित होते.

बैठकीत मे २०२६ च्या बैठकीतील आदेशानुसार धोकादायक शाळा खोल्यांची अद्ययावत माहिती शिक्षण विभागास पाठवण्याबाबत बांधकाम विभागाने काय कारवाई केली, याचा अहवाल मागवण्यात आला. तत्‍काळ अहवाल सादर न केल्‍यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा उपाध्यक्ष पवार यांनी दिला आहे.

शिवरत्‍न नाव बदलण्यास पाठपुरावा करा

जिल्‍हा परिषदेच्‍या दुसऱ्या मजल्‍यावरील शिवरत्न सभागृहाचे नाव बदलून ‘भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी’ करण्याचा ठराव स्‍थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत झाला आहे. त्‍याचा प्रस्‍ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्‍याविषयी शासन स्तरावर सातत्‍याने पाठपुरावा करण्याचा निर्णय बैठकीत झाला.

उद्यानाच्‍या कामाला लवकरच सुरुवात

रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या कामाला तत्‍काळ मंजुरी देण्याबाबत बांधकाम विभागाच्‍या बैठकीत चर्चा झाली असून, लवकरच त्‍या कामाला सुरुवात होणार असल्‍याची माहिती उपाध्यक्ष पवार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT