सोलापूर : पैशाच्या कारणावरून एका युवकाला चापटी मारल्याने तो बेशुद्ध होऊन मरण पावल्याची घटना बुधवारी (दि.23) सायंकाळच्या वेळेस जुळे सोलापुरात घडली.
दशरथ अर्जुन धोत्रे ( वय 27, रा. गुरुदत्त नगर, जुळे सोलापूर, सोलापूर) हा घराजवळील ड्रेनेजच्या मोठ्या पाइपवर बसला होता. यावेळी पैशाच्या कारणावरून गोविंद बिराजदार याने त्याला चापट मारली. त्यामुळे तो खाली पडून बेशुद्ध झाला. त्याला भाऊ युवराज धोत्रे याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारापूर्वी तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. निधनाचे वृत्त कळताच नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी आणि शासकीय रुग्णालयात दाखल झाले. दरम्यान याबाबत बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.