पानीव : भारतीय लष्करात सेवा बजावत असताना वीरगती प्राप्त झालेले पानीव गावाचे सुपुत्र हवालदार यशवंत भानुदास बाबर यांच्यावर बुधवारी सकाळी 11 वाजता गावातील वैकुंठभूमीत लष्करी सन्मानाने व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव आशुतोष यांनी मुखाग्नी दिला. याप्रसंगी गावकर्यांनी, मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी भावपूर्ण निरोप दिला.
हवालदार यशवंत बाबर हे सध्या कोची (केरळ) येथे कर्तव्यावर होते. रविवारी (ता. 20 जुलै) पहाटे दोन वाजता त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे दुःखद निधन झाले. ही बातमी गावात पोहोचताच शोककळा पसरली. बुधवारी सकाळी त्यांच्या पार्थिवाचे गावात आगमन होताच भारतमाता की जय, यशवंत बाबर अमर रहे, जय हिंद अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवण्यात आले. राष्ट्रगीतानंतर पानीव येथील वैकुंठभूमीत सकाळी 11 वाजता लष्करी सलामीसह अंत्यसंस्कार पार पडले. लष्कराच्या जवानांनी वीरपुत्रास मानवंदना दिली. यासाठी पानीव ग्रामपंचायतकडून सर्व जय्यत तयारी करण्यात आली होती.
याप्रसंगी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार राम सातपुते, नायब तहसीलदार प्रवीण सुळ, रविकिरण शेटे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार, संघटक बाळासाहेब खराडे, तालुकाध्यक्ष सुरेश तोरसे, श्रीलेखा पाटील, पोलिस उपनिरीक्षक साळुंखे, सरपंच लता कांबळे, अभिषेक पाटील, करण पाटील, सुजय माने-पाटील, ग्रामसेवक नवले. तसेच सोलापूर जिल्हा व माळशिरस तालुक्यातील असंख्य माजी सैनिक यांच्यासह श्रीराम शिक्षण संस्थेतील हजारो विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
रक्षाबंधन अगदी काही दिवसांवर असतानाच, यशवंत बाबर यांच्या बहिणीने भावाच्या पार्थिवावर राखी बांधत अनोखा रक्षाबंधन साजरा केला. हा क्षण पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. राखीच्या धाग्यात यावेळी प्रेमासोबतच बलिदान, अभिमान आणि दुःखही गुंफले गेले होते, असे चित्र प्रत्येकाच्या मनात कोरले गेले. हवालदार बाबर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई आणि भाऊ असा परिवार आहे.