सोलापूर : महीम (ता. सांगोला) येथे आजवर दुर्लक्षित असणार्या शिलालेखाची उकल झाली आहे. सोलापुरातील संशोधक नितीन अणवेकर यांनी गावकर्यांच्या मदतीने या लेखाची शिळा स्वच्छ करून त्याचे ठसे घेतले. पुण्यातील इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे आणि अथर्व पिंगळे यांनी त्याचे वाचन केले असता हा तेराव्या शतकातील राजा महादेवराय यादवांचा शिलालेख असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिलालेखात शके 1191 असा कालोल्लेख आहे. यादव राजा महादेवाची प्रशस्ती आली आहे. पिल्ले जंत्रीनुसार त्याची तारीख 9 मे 1269 अशी येते. महादेव राजाच्या काळातील एका मंदिरास 20 गद्यान दानाची नोंद हा शिलालेखाचा मुख्य विषय आहे. त्याची भाषा संस्कृत आणि पुढे जुनी मराठी आहे. एकूण 22 ओळी आहेत. अठराव्या ओळीनंतरचा भाग फुटलेला असून फुटलेल्या भागाचा शोधही लागला आहे. त्यात ‘स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरां..’ अशी सुरुवात असणारे प्रसिद्ध शापवचन आलेले आहे. जिल्ह्यावर मध्ययुगीन काळात कल्याणीचे चालुक्य, मंगळवेढ्याचे कलचुरी, अक्कलकोटचे शिलाहार, द्वारसमुद्रचे होयसळ, देवगिरीचे यादव इ. विविध राजघराण्यांची सत्ता होती. जिल्ह्याच्या राजकीय अभ्यासाच्या द़ृष्टीने सदर शिलालेख महत्त्वाचा आहे. त्याच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे अणवेकर यांनी म्हटले आहे.
यादव राजा महादेवाच्या काळातील जिल्ह्यात सापडलेला हा पहिलाच शिलालेख आहे. त्यातील संपूर्ण मजकुराचा अर्थ लावण्याचे काम थोड्याच काळात पूर्ण होईल.अनिल दुधाणे, इतिहास अभ्यासक
सोलापुरात मिळालेला 9 मे 1269 सालचा या राजाचा हा पाहिला शिलालेख आहे. कर्नाटकमधील इंडी तालुक्यात एक शिलालेख सोलापूरच्या शिलालेखानंतर केवळ दोन महिन्यांनी नोंदवलेला आहे. तो कन्नड भाषेत आहे. महादेवरायांच्या कालखंडातच कन्नड व मराठी भाषिकची सीमा निश्चित होत होती.विशाल फुटाणे, इतिहास व पुरातत्त्व संशोधक