सोलापूर

Pandharpur news: चुकीचे रस्त्याचे अंतर दाखवल्याने वाहनधारकांची दिशाभूल

पंढरपूर येथून सोलापूर अंतर 75 कि.मी. असताना दाखवले 119 कि.मी.

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : पंढरपूर तीर्थक्षेत्राकडे दररोज हजारो भाविक ये-जा करतात. पंढरपूर येथून पुढे सिध्देश्वर देवस्थान सोलापूर, श्री स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोट, तुळजा भवानी मंदिर तुळजापूर जवळच आहेत. त्यामुळे पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आलेला भाविक हा सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूरला जातोच. मात्र, याच भाविकांच्या वाहनाची रस्त्याचे अंतर चुकीचे दाखवल्यामुळे फसवणूक होत आहे. पंढरपूरनजीक वाहन प्रवेश करताच वाहनधारक गोंधळून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. याचे कारणही तसेच आहे.

पंढरपूर ते सोलापूर हे अंतर 75 कि.मी.चे असताना पंढरपूर बायपास रस्ता येथे मात्र पंढरपूर ते सोलापूर अंतर हे 119 कि.मी. असल्याचे दिशादर्शक फलकावर दाखवण्यात आले आहे. त्यामुळे येथे भाविकांना घेवून आलेले वाहनधारक तसेच जड अवजड वाहनधारकांची दिशाभूल होत आहे. यामुळे पंढरपूरहून सोलापूरला जाण्यासाठी वाहनधारक इतर मार्गांचा अवलंब करण्याची शक्यता अधिक आहे. पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावळा गोंधळामुळे अनेक रस्त्यांवर चुकीचे अंतर टाकणे, दर्शक फलक न लावणे आदी प्रकार केले जात आहेत. त्यामुळे वाहनधारकासह सर्वसामान्य नागरिकांची गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. तर सोलापूरचे अंतर पाहून वाहनधारक चौकशी करण्यासाठी थांबला तर याचा फायदा घेऊन लुटमारीचेदेखील प्रकार घडत आहेत.

पंढरपूर शहराला जोडणाऱ्या रस्त्यांपैकी सिमेंट काँक्रीटचे रस्ते वळगता इतर रस्त्यांवर खड्ड्यांचा जास्त भरणा आहे. या खड्ड्यातून वाट काढत भाविकांची वाहने पंढरपूरला ये जा करतात. तसेच स्कूल बस, मालवाहतूक करणारी वाहने, दुधाचे टँकर, दुचाकी, चारचाकी वाहने यांची ये जा असते. यातच पंढरपूरला आषाढी, कार्तिकी, माघ व चैत्री या महत्वाच्या चार मोठ्या यात्रा दरवर्षी भरतात. या यांचे नियोजन करण्यासाठी विभागीय आयुक्तांसह जिल्हा प्रशासन पंढरपूर भागात प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी करते. आषाढी यात्रेला शासकीय महापुजेला राज्याचे मुख्यमंत्री तर कार्तिकी यात्रेला उपमुख्यमंत्री येतात.

यावेळी पालखी महामार्ग, राज्य महामार्गाचे अधिकारी तसेच जिल्हा महामार्गाचे अधिकारी उपस्थित असतात. मात्र, त्यांच्या निष्काळजीपणामुळे स्थानिक अधिकारी, अभियंता, ठेकेदार हे रस्ते दुरुस्ती, नामफलक, दिशादर्शक फलकाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे वाहनधारकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT