पंढरपूर : पंढरपुरातील एका भाविकाने लाडू प्रसादाच्या पाकिटामध्ये अळ्या आणि लाडूला बुरशी लागल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित भाविकाने लाडू प्रसादाच्या पाकिटामध्ये आळी आणि लाडूला बुरशी लागल्याचा आरोप केला आहे. मंदिर समितीकडून लाडू पाकिटात अळी दिसून आल्याचे मान्य करत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या मंदिर समितीचे व्यवस्थापन प्रभारी कार्यकारी अधिकारी, प्रभारी व्यवस्थापक पाहत आहेत. त्यामुळे कामात हलगर्जीपणा होत असल्याचे बोलले जात आहे. मंदिर समितीकडून अल्प दरामध्ये लाडू प्रसाद विक्री केला जातो. मात्र याच लाडू प्रसादाच्या पाकिटामध्ये रविवारी चक्क अळी आणि बुरशी असल्याचे संबंधित भाविकाने समाज माध्यमांमध्ये व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्यामुळे मंदिर समितीच्या या ढिसाळ आणि भोंगळ कारभाराविषयी भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
विठुरायाच्या लाडू प्रसादाच्या पाकिटामध्ये चक्क अळ्या आणि लाडूला बुरशी लागल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे मंदिराचा कारभार सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे आहे. अशातच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके हे रजेवर आहेत. तर तात्पुरती जबाबदारी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्याकडे आहे. तर प्रभारी व्यवस्थापक म्हणून राजेंद्र राऊत हे काम पाहत आहेत. सध्या मंदिर समितीचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर असल्याचे दिसून येत आहे. परिणामी मंदिराच्या कामकाजात ढिसाळपणा, हलगर्जीपणा दिसून येत आहे.
संबंधित कामगारांना नोटीस
लाडू केंद्रामध्ये लाडू तयार केले जातात. लाडू प्रसाद पाकिटामध्ये अळी दिसून आली आहे. हा प्रकार गंभीर आहे. संबंधित कामगारांना नोटीस दिली असल्याचे मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक राजेंद्र राऊत यांनी सांगितले.