सोलापूर : जागतिक युवा दिनानिमित्त सोलापुरातील युवक-युवतींशी दै. ‘पुढारी’ने संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
देशाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या युवांनी आपल्या भविष्यासोबतच शहराच्या विकासाचेही प्रश्न मांडले. सोलापुरातच रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, ड्रग्ज, मावा यांसारख्या व्यसनाधीन पदार्थांना कायमचा आळा बसावा, दळणवळणाची सुविधा सक्षम व्हावी, तसेच युवतींना सुरक्षित वातावरण मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. होटगी रोडसारख्या ज्वलंत विषय आणि शिक्षण, रोजगार, सुरक्षितता आणि विकासाच्या मुद्द्यांवर युवांनी दिलखुलासपणे मते मांडली.
सोलापूर शहरात मावा, गुटखा आणि ड्रग्जसारख्या व्यसनाधीन पदार्थांची विक्री होत असल्याचे चित्र चिंताजनक आहे. विशेषतः ड्रग्जची ऑनलाइन अॅप्सच्या माध्यमातूनही विक्री होत असल्याची चर्चा आहे. विद्यार्थ्यांपर्यंत हे पदार्थ सहज पोहोचत असतील, तर विक्री करणाऱ्यांपर्यंत पोलिस का पोहोचू शकत नाहीत, हा प्रश्न आहे. तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या पदार्थांविरोधात पोलिसांनी कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी. सोलापूरला मावा, गुटखा आणि ड्रग्जमुक्त करण्यासाठी अशा पदार्थांचा समूळ नायनाट होणे गरजेचे आहे.- हेमंत पाटील (विद्यार्थी)
मी तुळजापूरहून सोलापूरला शिक्षणासाठी येते. दररोज जवळपास ८० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. या प्रवासादरम्यान सुरक्षिततेची चिंता कायम मनात असते. बाहेरगावाहून सोलापूरला शिक्षणासाठी येणाऱ्या अनेक युवतींच्याही मनात प्रवास करताना भीती असते. त्यामुळे युवतींना सुरक्षित आणि निर्भय वातावरण मिळणे गरजेचे आहे. प्रवासादरम्यान युवतींच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना व्हाव्यात, ही आमची अपेक्षा आहे.- स्नेहा तुळजापूरकर (विद्यार्थिनी)
सोलापूर शहरात शिक्षण पूर्ण होते. मात्र त्यानंतर रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने तरुणांना पुणे, मुंबईसारख्या मेट्रो शहरांकडे कामासाठी स्थलांतर करावे लागते. ही दुर्दैवाची बाब आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास सोलापूरचा युवा दुसऱ्या शहरांकडे स्थलांतरित होणार नाही.- समर्थ हुलसुरे (विद्यार्थी)
सोलापूरच्या युवकांना केवळ संधींची गरज नाही. तर त्या संधी सोलापुरातच निर्माण होण्याची गरज आहे. युवकांना योग्य व्यासपीठ मिळाले, तर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते. शिक्षणासोबत सुरक्षित प्रवास, रोजगार, क्रीडा, तंत्रज्ञान आणि नेतृत्वाच्या संधी वाढल्या पाहिजेत. विशेषतः मुलींना समान संधी आणि सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे वाटते.- अंकिता गुमास्ते (विद्यार्थिनी)
सोलापुरातील रस्त्यांची अवस्था चांगली नाही. बस वाहतूक व्यवस्थाही सुरळीत नसल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. होटगी रोडचे काम झाल्यानंतर लगेचच पुन्हा रस्ता खोदण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे विकासकामांमध्ये योग्य नियोजनाचा अभाव दिसून येतो. शहरातील रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे हे सर्वात पहिले प्राधान्य असले पाहिजे.- समर्थ तट्टे (विद्यार्थी)