सोलापूर : कीटकमुक्त परिसर हा निरोगी जीवनाचा आधार ठरतो. यासाठी आजची कीटक नियंत्रणातील जागरूकता, उद्याच्या निरोगी आणि सुरक्षित समाजाची हमी आहे. कीटकांमुळे होणारे आरोग्यविषयक, आर्थिक व पर्यावरणीय नुकसान याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे आवाहन रमेश पवार यांनी केले आहे. दरवर्षी ६ जून हा जागतिक कीटक व्यवस्थापन दिन साजरा केला जातो. यानिमित्त जागृती साधली जाते.
आपल्या घरामध्ये, कार्यालयांमध्ये, रुग्णालयांमध्ये, शाळांमध्ये तसेच उद्योगांमध्ये आढळणारे झुरळ, मच्छर, उंदीर, वाळवी, माश्या व इतर कीटक अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात. विशेषतः मच्छरांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, झिका यांसारखे आजार पसरतात. जागतिक कीटक व्यवस्थापन दिनानिमित्त सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, घर, परिसर व कार्यस्थळ स्वच्छ ठेवावे, साचलेले पाणी टाळावे, कीटकांचा प्रादुर्भाव दिसताच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि सुरक्षित व निरोगी वातावरण निर्मितीसाठी योगदान द्यावे.
झुरळ, वाळवीमुळे विविध त्रास
झुरळांमुळे अन्न दूषित होऊन अन्नविषबाधा, त्वचारोग व श्वसनाचे त्रास उदभवू शकतात. वाळवी हा एक असा कीटक आहे जो शांतपणे आणि न दिसता मोठ्या प्रमाणावर नुकसान करतो. घरातील लाकडी फर्निचर, दरवाजे, खिडक्या, कागदपत्रे, पुस्तके तसेच इमारतींच्या लाकडी संरचनांचे नुकसान करून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान घडवून आणू शकतो. अनेकदा नुकसान लक्षात येईपर्यंत परिस्थिती गंभीर झालेली असते.
तज्ज्ञांकडून व्यवस्थापन करा
कीटक नियंत्रण हे केवळ त्रासदायक ठरणारे कीटक नष्ट करण्याचे काम नसून सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण, अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि मालमत्तेचे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण असे कार्य आहे. योग्यवेळी तज्ज्ञांकडून कीटक व्यवस्थापन केल्यास अनेक आजार व आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.