Mental Health Pudhari
सोलापूर

World Mental Health Day : सतत विचार, चिंतेने मनाभोवती तणावाचेच जाळे

स्पर्धा, वाढत्या अपेक्षा अन् नकारात्मकतेचा विळखा; मानसिक सजगतेची गरज

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : हातात मोबाईल, डोक्यात भविष्याची चिंता आणि मनात भूतकाळातील घटनांचा सतत विचार. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण या चक्रात अडकले आहेत. सोशल मीडियावरील फेक न्यूज, मोबाईलचे व्यसन, वाढती स्पर्धा, बेरोजगारी आणि कौटुंबिक प्रश्न यांमुळे मानसिक तणावाचे आव्हान अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे शरीराइतकीच मनाची काळजी घेण्याची गरज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त अधोरेखित होत आहे.

मुलांनी त्रास देऊ नये म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देण्याचे प्रमाण वाढले आहे. पण त्यातून मुलांना स्क्रीनचे व्यसन जडण्याचा धोका निर्माण होतो. दुसरीकडे, तरुणांमध्ये करिअरची चिंता आणि अपेक्षांचे ओझे वाढत आहे. सोशल मीडियावरील अपुऱ्या माहितीमुळे किंवा अचानक व्हायरल होणाऱ्या फेक न्यूजमुळेही काहींना मानसिक धक्का बसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. व्यसनाधीनतेचाही मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. भूतकाळातील घटनांचा सतत विचार करणे किंवा भविष्याची अनावश्यक चिंता करत राहिल्याने नकारात्मक विचारांचे जाळे अधिक घट्ट होऊ शकते.

सतत उदास वाटणे, चिडचिड, झोपेतील बदल आणि एकटेपणा जाणवणे यांकडे दुर्लक्ष करू नये. नियमित व्यायाम, पुरेशी झोप, पौष्टिक आहार, छंदांची जोपासना आणि आप्तस्वकीयांशी संवाद यामुळे मनाला आधार मिळतो. गरज भासल्यास तज्ज्ञांची मदत घ्यावी. मानसिक त्रास लपविण्यापेक्षा त्यावर वेळीच उपचार घेणे, हाच निरोगी मनाचा मार्ग असल्याचे मनोचिकित्सक डॉ. निहार बुरटे यांनी सांगितले.

मोबाईलचा अतिवापर, सोशल मीडिया, वाढती स्पर्धा आणि भविष्याची चिंता यामुळे मानसिक तणाव वाढत आहे. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी छंद जोपासणे, व्यायाम आणि कुटुंबीयांशी संवाद महत्त्वाचा आहे. मानसिक त्रास दीर्घकाळ जाणवत असल्यास वेळीच तज्ज्ञांची मदत घ्यावी.
- डॉ. निहार बुरटे, (मानसोपचार तज्ज्ञ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT