सोलापूर : दुकानांसारख्या आस्थापनामध्ये कामांवर बालकामगार ठेवल्यास कारवाईचा इशारा सहाय्यक कामगार आयुक्तांनी दिला आहे. दि. १२ जून या जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिनाचे औचित्य साधून सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, सोलापूर मार्फत बालकामगार प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जिल्हा कृती दलामार्फत सोलापूर जिल्ह्यात दिनांक १२ जून रोजी कारखान्यांना भेटी दिले जाणार आहे.
बालकामगार प्रथा विरोधी सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. जागृतीसाठी पोस्टर चिकटविणे आणि जनजागृती करणे यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत आस्थापनांची तपासणी करून बालकामगार आढळून आल्यास त्यांची मुक्तता करणे आणि बालकामगार अधिनियमांतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याबरोबर असा प्रकार आढळल्यास संबंधीत मालक, चालक यांचेकडून त्यांच्या आस्थापनांमध्ये १४ वर्षाखालील बालकामगार काम करीत नाहीत आणि भविष्यातही काम करणार नाहीत, असे हमीपत्रही संबंधितांकडून घेण्यात येणार आहे.
कोणत्याही कारखाना, आस्थापना, हॉटेल, गॅरेज तसेच धोकादायक उद्योगामध्ये बालकामगार ठेवणे कायद्याने गुन्हा असून अशा ठिकाणी बालकामगार आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. कारखाना, आस्थापना, हॉटेल, गॅरेज तसेच इतर धोकादायक उद्योग यामध्ये बालकामगार ठेवू नयेत, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश रा. झोले यांनी केले आहे.