सोलापूर : नियमित सायकल चालवल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. सायकल चालवल्याने वजन कमी होते, हृदय निरोगी राहते, स्नायू मजबूत होतात आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते. आरोग्यासोबतच सायकलिंगमुळे जीवाश्म इंधनाचा वापर कमी होतो, ज्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी होते आणि पर्यावरणाचे संरक्षण होते, म्हणून प्रत्येकाने सायकलिंगला दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवावे, असे आवाहन सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांनी केले.
भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन आणि महानगरपालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन आणि सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन केले होते, त्याच्या उद्घाटनप्रसंगी यादव बोलत होते. यावेळी निवृत्त अधिकारी सतीश घोडके, रॉयल रायडर्स सायकलींग असोसिएशनचे अध्यक्ष अभिनय भावठाणकर, निवृत्त जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे, पर्यावरण विभागाचे व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर, कार्यालय सहायक जे. एम. हन्नुरे उपस्थित होते.
यादव आणि पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे यांच्या हस्ते सकाळी साडेसहा वाजता महापालिकेच्या आवारातून हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅली सुरू केली. या उपक्रमामध्ये पराग दोशी, सुबोध जंगे, सुरेश बालगावकर, श्रीधर वडनाल, राजकुमार बिंगी, अशोक बिराजदार, तुकाराम क्षीरसागर, सत्यनारायण दिकोंडा, गोवर्धन जोशी, अंजली शेंडगे, प्रेषिता चपळगावकर, विष्णू गोसकी, किरण भीमर्थी, शेखर वडीशेरला, संजय करवंदे, महेश कासार, प्रथमेश कुमठेकर, श्रीकांत मामुरे, दत्ता ढोणे या सायकलप्रेमींनी भाग घेतला.
महापालिकाकडून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात कामे होत आहेत. याला सोलापूरकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे यांनी केले.