सोलापूर : विमान म्हणजे केवळ आकाशात उडणारे यंत्र नव्हे, तर त्यामागील तंत्रज्ञान प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी आता सोलापूर विज्ञान केंद्रात विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
भारतीय वायु दलाचे दोन आसनी ट्रेनर जेट सोलापूर विज्ञान केंद्रात ठेवण्यात आले आहे. त्याविषयी जागतिक विमान दिनाच्या निमित्ताने हे विशेष वृत्त आहे. ट्रेनर जेटच्या जुळणीचे काम पूर्ण झाले आहे. रंगरंगोटी आणि आसनांच्या कुशनचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच हे विमान नागरिक व विद्यार्थ्यांसाठी खुले केले जाणार आहे.
भारतीय वायु दलाच्या अधिकाऱ्यांनी जेटची जुळणी पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जेटमध्ये बसून त्यातील आसने, कॉकपिट आणि विमानाची रचना जवळून पाहता येणार आहे. त्यामुळे विज्ञान केंद्रातील हे जेट विद्यार्थ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरणार आहे. विज्ञान केंद्राचे समन्वयक राहुल दास यांनी ही माहिती दिली. विज्ञान केंद्रात सुमारे दीड हजार किलो वजनाचे क्रायोजेनिक इंजिनही ठेवण्यात आले आहे.
विमानासोबतच अंतराळ आणि रॉकेट तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपकरणांच्या माध्यमातून मिळते.१४ फेब्रुवारी २०१० रोजी सोलापूर विद्यापीठाच्या बाजूला विज्ञान केंद्राची सुरुवात झाली. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिक व विद्यार्थ्यांनी केंद्राला भेट दिली आहे. दरवर्षी ३० हजारांहून अधिकजण येथे येतात. सध्या नागरिकांसाठी प्रवेश शुल्क ७० रुपये, तर विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलतीमुळे ३५ रुपये आहे. महाराष्ट्रातील हे तिसरे विज्ञान केंद्र आहे.