सोलापूर : होटगी रोडवरील राज्य कामगार विमा रुग्णालयात विमा आयसीयू कक्षाची सुरुवात झाली. राज्यातील अन्य रुग्णालयात ज्याप्रमाणे अत्याधुनिक पद्धतीची आरोग्य सेवा दिली जाते. तशीच आरोग्य सेवा येथील विमा कामगार रुग्णालयात पुढील काळात मिळणार आहे. यामुळे येथील रुग्णालयाचा अत्याधुनिक पद्धतीचा सेवा देणाऱ्या अन्य रुग्णालयात समावेश झाला आहे.
येथील कामगारांच्या या विमा रुग्णालयात तातडीच्या वैद्यकीय सेवेचा अभाव होता. रुग्णांची तपासणी करून संदर्भीय वैद्यकीय उपचारासाठी शहरातील अन्य रुग्णालयांशी करार केला होता. यात यशोधरासह अन्य रुग्णालयाचा समावेश होता. तातडीच्या उपचारासाठी अन्य मोठ्या शस्त्रक्रियेच्या उपचारासाठी रुग्णालयात पाठवावे लागत असे. अत्यवस्थ रुण आल्यास त्यांना अन्य रुग्णालयाला पाठवण्याशिवाय येथील व्यवस्थापना समोर पर्याय नव्हता.
आता या रुग्णालयात अतिदक्षता कक्ष (आयसीयू) सुरू झाला आहे. येथील या कक्षात सुपरस्पेशालिस्ट, इन्टेन्व्हीस्ट व अन्य तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामुळे, अत्यवस्थ रुग्णांना तातडीचा उपचार येथे मिळणे शक्य होणार आहे. कामगारांसाठी आधुनिक वैद्यकीय सेवा अत्यंत गरजेची ठरणार आहे. येथील अतिदक्षता कक्षात या अत्याधुनिक सेवा उपलब्ध केल्या असून येथे अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवून ती कार्यान्वित केली आहे. या विमा रुग्णालयातील अति दक्षता विभागात ही तज्ज्ञ डॉक्टर वैद्यकीय सेवा देतील.
या आयसीयूमध्ये ऑन्कॉलॉजीस्ट डॉ. सुमा डी या सुपरस्पेशालिस्ट असतील. तसेच इन्टेन्व्हीस्ट म्हणून डॉ. विश्चाखा कोनारी, डॉ. आरव कांबळे, डॉ. हिरेमठ, डॉ. प्रशांत खरात, नेफ्रॉलॉजीस्ट डॉ. साजिद शेख, कार्डीओलॉजीस्ट डॉ. विवेक अगरवाल उपलब्ध आहेत.