Women Maharashtra Kesari Pudhari
सोलापूर

Women Maharashtra Kesari: महिला महाराष्ट्र केसरीचा सोलापुरात आजपासून थरार

राज्यभरातून 400 मल्ल दाखल : आज 50 ते 72 किलो गटातील लढती

पुढारी वृत्तसेवा
दीपक शिराळकर

सोलापूर : सोलापूरच्या ऐतिहासिक हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आजपासून (दि. 28) चौथी वरिष्ठ गट महिला महाराष्ट्र केसरी राज्य अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होत आहे. आज (दि. 28) व उद्या (दि. 29) स्पर्धेत महिला कुस्तीचा थरार पाहायला मिळणार आहे. सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणार्थ निर्झरा केअर फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह राज्यभरातील 36 जिल्ह्यांतील 40 संघांतील 400 हून अधिक महिला कुस्तीगीर सोलापुरात दाखल झाल्या आहेत. ह. दे. प्रशालेच्या मैदानावर आज (दि. 28) सायंकाळी पाच वाजता ग्रामविकास तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ. सचिन कल्याणशेट्टी, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अस्लम काझी, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांची विशेष उपस्थिती असेल. या स्पर्धेसाठी खुल्या गटातील विजेतेपदाच्या प्रमुख दावेदार सोनाली मंडलिक , अमृता पुजारी, सृष्टी भोसले, सिद्धी होळकर व अपेक्षा पाटील या नावाजलेल्या महिला मल्ल सोलापुरात दाखल झाल्या आहेत.

आज (दि. 28) उद्घाटनादिवशीच मैदानावर 50 ते 72 किलो गटातील लढती प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारण फेडणार आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंचांच्या देखरेखीखाली या मैदानावर पारदर्शक निकाली कुस्त्या होत आहेत.

सलग तिनदा विजेत्या भाग्यश्रीची अनुपस्थिती

सलग तीन वेळा महिला महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणाऱ्या विजेत्या भाग्यश्री फंड हिने यंदाच्या स्पर्धेत सहभाग घेतलेला नाही. तिच्या अनुपस्थितीमुळे यावेळेस सोलापूरच्या मैदानात नवीन महिला पैलवानाला विजेतेपदाची मोहोर उमटवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT