सोलापूर : राज्यातील शेती व शेतीपूरक व्यवसायात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या महिलांना आता ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ मिळणार आहे. यातूनच त्यांना कृषी उद्योजिका होण्याची संधी मिळणार आहे. राज्य शासनाने ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ लागू केला असून, त्याअंतर्गत महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कृषी विभागाने यासाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टलही सुरू केले आहे.
कृषी विभागाच्या सेवासंकल्प अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत पात्र महिला शेतकऱ्यांची ओळख, प्रमाणपत्रासाठी अर्ज स्विकारुन ती प्रमाणपत्रे दिली जात आहेत. महिला शेतकरी म्हणून मान्यता देताना केवळ महिलेच्या नावावर जमीन आहे की नाही, यापेक्षा शेतीतील प्रत्यक्ष सहभागाला महत्त्व दिले जाणार आहे.
जमीनमालक महिला, भाडेपट्ट्याने किंवा बटाईने शेती करणाऱ्या महिला, भूमिहीन शेतकरी महिला, शेतमजूर तसेच शेतीपूरक व्यवसायात कार्यरत महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. पिकांची लागवड, फलोत्पादन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, रोपमळा मजूर, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, मधुमक्षिकापालन, रेशीम उत्पादन, पुष्पोत्पादन आदी कामांमध्ये सहभागी महिलांना या मान्यतेचा लाभ दिला जाणार आहे.
पंधरा दिवसांत मिळेल प्रमाणपत्र
१८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आणि शेती व्यवसायात कार्यरत असलेल्या पात्र महिलांना प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्जानंतर ग्रामसभा किंवा नगरपंचायतीच्या सभेत अर्जावर निर्णय होऊन याबाबत मान्यता मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे.
प्रमाणपत्राचा फायदा काय?
महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळाल्यामुळे कृषी योजना, कृषी कर्ज, पीकविमा, कृषी निविष्ठा, प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि विविध कृषी सेवांचा लाभ घेणे सुलभ होण्याचा उद्देश आहे. महिला शेतकऱ्यांचा स्वतंत्र अधिकृत डेटाबेस तयार करण्याचीही तरतूद केली आहे.
अशी आहे पात्रता
अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय आणि शेती किंवा शेतीपूरक कामात सक्रिय सहभाग, आधार क्रमांक व आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.