करमाळा : दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या भावाचा चिडून जाऊन सख्ख्या बहिणीने गळा दाबून खून केला आहे. पतीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार करमाळा पोलिसांनी २४ तासात उघडकीस आणला आहे.
मल्हारी पोपट कांबळे (वय : ३६, रा. केम) असे खून झालेल्याचे नाव असून मयताची बहिण शीतल राजू केंगार ( वय : ३२ ) व मयताचा भावजी राजेश बापू केंगार ( वय : ३० ) दोघेही रा. केंम तालुका करमाळा असे खून केलेल्या संशयित नातेवाईकांचे नावे आहेत. करमाळा पोलिसांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात या दोघांना उभे केल्यानंतर त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबतची हकीकत अशी की दि.१२/०४/२०२६ रोजी मौजे केम गावातील दत्तात्रय तुकाराम देवकर यांचे शेती गट नं. ५२७ मध्ये विहीरीचे भरावाचे कडेला असलेले मकवानाच्या गंजीच्या आडोशाला मयत मल्हारी पोपट कांबळे वय ३८ वर्षे यांचे प्रेत मिळून आले होते . त्याची इकडील पोलीस ठाणे अकस्मात मयत नं ३८/२०२६ भा.ना.सु. कलम १९४ प्रमाणे दाखल करण्यात आले होते. मयताचे चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करीत होते. मयत व संशयित आरोपी
हे सर्व केम येथील वीट भट्टीवरील कामगार आहेत. त्यांनी मयताचे चौकशीत मयताचे नातेवाईक शीतल राजू केंगार (बहीण) , राजेश बापू केंगार (भावजी) , पोपट यंका कांबळे यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी मयतास दारू पिण्याचे व्यसन असलेचे स्पष्ट झाले. त्यांनी त्याच्या मृत्युबाबत कोणावरही संशय नसल्याचेही सांगितले. मात्र मयताचे वैद्यकीय अहवालामध्ये वैदयकीय अधिकारी यांनी मयताचे कारण गळा आवळल्याने दिले असलेने मयताचे तपासिक अंमलदार पोपट बबन टिळेकर अज्ञात इसमांविरुध्द सरकारतर्फे फिर्याद दिली होती. भा.न्या.सं. कलम १०३ (१) अन्वये अज्ञात इसमाचा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर करमाळा पोलीस अलर्ट झाले.
पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी गुन्हे अन्वेषण पथकासह घटनास्थळी तात्काळ भेट देवून गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेतला. शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपटराव टिळेकर, भाऊराव शेळके, बिबीशन जाधव, अजित उबाळे, महेश डोंगरे, मनीष पवार आदींनी या घटनेबाबत मुळापासून तपास सुरू केला. यामध्ये मयताची बहिण शीतल राजू केंगार व भावजी राजेश बापू केंगार यांचे हावभाव हालचाली त्यांच्यावर संशय आलेने त्यांचेकडे कसून तपास केला. पोलिसी खाक्या दाखवताच मयताची बहीण शीतल राजू केंगार हिने सर्व इतिहास उघड केला, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
संशयित आरोपीनी सांगितले की, मयत मल्हारी कांबळे हा रोज दारू पिउन बहिणीशी भांडण करायचा. तुम्ही येथून निघून जा असे म्हणायचा. यामुळे ती फार वैतागलेली होती. दिनांक ११/४/२६ रोजी भाउ मल्हारी हा नेहमीप्रमाणे दारू पिवून घरी आला होता. त्याला नीट उभारताही येत नव्हते . त्यावेळी त्याने नेहमीप्रमाणे भांडण केले. त्यावेळी राग सहन न झालेने मयताची बहीण शितल केंगार याने ओढणीने भाउ मल्हारी कांबळे याचा गळा आवळला. यामध्ये तो मृत झाला. यावेळी पती राजेश केंगार यास सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दोघांनी मिळून मयत मल्हारी कांबळे याचे प्रेत दोघांचे खांदयावर घेवून रानारानातून जावून दत्तात्रय तुकाराम देवकर यांचे विहीरीचे भरावाचे कडेला असलेले मकवानाच्या गंजीच्या आडोशाला मृतदेह टाकून दिला.
या गुन्हयाची कबुलीही दोघा संशयित आरोपींनी दिली आहे. त्याअनुषंगाने गुन्ह्यातील शीतल राजू केंगार (वय ३२ २) राजेश बापू केंगार (वय ३०) दोघे (रा. केम ता. करमाळा) यांना नमुद गुन्ह्यात अटक करून तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळवली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने हे करीत आहेत.
यांनी लावला तपास....
उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा विजय सिन्हा , करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर, पोलीस उपनिरीक्षक बिबीशन जाधव, हवालदार अजित उबाळे, आप्पा लोहार, महेश डोंगरे, भाउराव शेळके, मनिष पवार, वैभव ठेंगल, अर्जुन गोसावी, हनुमंत भराटे, अमोल रंदिल यांच्या पथकाने कसून तपास करत अज्ञात खुनाचा तपास लावला आहे.