सोलापूर : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, हा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावे लागेल. तुम्ही निवडणुका जिंका, मौजमस्ती करा, केवळ निवडणुकांसाठी कोणाचाही खून करू नका. हा महाराष्ट्र कोणत्या दिशेने जात आहे, ते जर पाहायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी सोलापुरात येऊन पहावे. म्हणजे तुम्हालाही वास्तव दिसेल, असा थेट सवाल मनसेचे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केला.
सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब सरवदे यांचा शुक्रवारी खून झाला होता. त्यांच्या कुटूंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ठाकरे सोलापुरात आले होते. यावेळी श्री. ठाकरे माध्यमांशी बोलत होते. बाळासाहेब सरवदेंच्या परिवाराला पक्ष आणि ठाकरे परिवार वाऱ्यावर सोडणार नाही. त्या दोन चिमुकली मुलींच्या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देण्याचे एकदा धाडस करावे. म्हणजे, महाराष्ट्र कोणत्या दिशेने घेऊन जात आहात. हे दिसेल. मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन या झालेल्या खुनाविषयी त्यांना बोलणार आहे.
निवडणुकीत भाजपकडून खून पाडणार असाल तर, अशा प्रकारची ती निवडणूक आम्हाला नको. अशी निवडणुक तुम्हीच जिंका. याबाबत आमची तक्रार नाही. निवडणुकीत खून पाडण्याची संस्कृती महाराष्ट्राची नाही. भाजपने राज्याची दिशा बदलून टाकली आहे. काहीही करून फक्त यांना सत्ता हवी आहे. कोणाच्या जगण्या मरणाशी देणेघेणे नाही.
यावेळी बाळासाहेब सरवदे यांचा भाऊ दाजी सरवदे, आई लक्ष्मी सरवदे, पत्नी वंदना सरवदे, मुली त्रिशा व प्रांशु, चुलते हरिदास सरवदे आदी कुटुंबियांसह मनसेचे दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख अभिषेक रामपूरे, लोकसभा मतदारसंघ प्रशांत इंगळे, वाहतूक सेनेचे जितेंद्र टेभुर्णीकर, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष जयश्री हिरेमठ, शिक्षक सेनेचे संतोषकुमार घोडके, विश्वास गजभार, सुभाष माने, निलेश भंडारे, सुनील होणारे, गोविंद बंदपट्टे, शशीकांत पाटील, नारायण गोवे, गणेश भोसले, प्रकाश कोळी, सुनिता जाधव, मीनल साठे आदी उपस्थित होते. मनसेचे नेते अमित ठाकरे एकूणच निवडणुकीच्या वातावरणाबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.