सोलापूर : राज्य शासनाचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणार्या शक्तिपीठ महामार्गासाठी लागणार्या जमीनीच्या मोजणीच्या नोटिसा सांगली जिल्ह्यातील शेतकर्यांना मिळाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील जमीन मोजणीचे काम कधी सुरू होणार, याची उत्सुकता शेतकर्यांना आहे.
गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर मार्गे मराठवाडा, आणि विदर्भातील बुलडाणा या मार्गातील आध्यात्मिक पर्यटन केंद्राला जाणारा शक्तिपीठ महामार्ग तयार केला जाणार आहे. त्यासाठी कोल्हापूर भागातून जास्त विरोध झाला. या 760 किलोमीटर महामार्गापैकी सर्वाधिक म्हणजे 156 किलोमीटर सोलापूर जिल्ह्यातून जाणार आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन संपादनाच्या प्रशासकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यात जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील 18 गावांतील जवळपास दोन हजारांवर शेतकर्यांना नोटीस बजावल्या आहेत. अंजनी, सावळज येथे 13 मे रोजी अधिकारी मोजणीसाठी येणार आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी हजर राहण्याच्या सूचना नोटीसमध्ये दिल्या आहेत. मात्र, संपादनासाठी मोबदला किती याचा उल्लेख त्यात नसल्याने शेतकर्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
शक्तिपीठ महामार्गापैकी सर्वाधिक जास्त मार्ग हा सोलापूर जिल्ह्यातून जाणार आहे. भूसंपादनासह विविध मुद्द्यांवर संबंधित प्रांतस्तरावर शेतकर्यांशी चर्चा होईल. त्यानंतर भूसंपादनबाबत कार्यवाही केली जाणार आहे.- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी